दिनांक ३१

इंदापूर : यंदाच्या उन्हाळ्याची तीव्रता अतिशय झपाट्याने वाढत असून तापमानात वाढ होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या अखरीस भयंकर उन्हाळ्याच्या झळा शेतकरी दुग्ध व्यवसायिक यांना आत्ताच पोहचू लागले आहेत. साधारणपणे दोन ते तीन महिने अशीच अवस्था राहिल्यास भयंकर पाणी संकटाला सामोरे जावे लागणार हे निश्चित आहे.
इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरील कोल्हापूरी पद्धतीचे सर्व बंधारे आत्ताच पाण्याविना कोरडे ठणठणीत असल्याचे चित्र आहे. नीरा नदीवरील निमसाखर, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, निरनिमगाव, सराटी या भागातील सर्व कोल्हापुरी बंधारे पाण्याविना कोरडे ठणठणीत आहेत यामुळे शेती व दुग्ध व्यवसायिक व नागरिक पाण्याविना वंचित आहेत. आतापासूनच एक प्रकारचे पाणी संकट या भागातील शेतकरी व नागरिकांच्या समोर उभे असल्याचे जाणवते. या भागातील शेतकरी सध्या पाण्यासाठी हवालदिल झाला असल्याचे चित्र आहे.
