दि. ४ नोव्हेंबर

सोलापूर, दि. ४ नोव्हेंबर, २०२३ : शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ ची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरु केली असून, लवकरच सोलापूर जिल्ह्याची निविदा प्रसिद्ध होईल. ज्या उपकेंद्रांची सौर प्रकल्पासाठी निवड झाली आहे अशा सर्व उपकेंद्राच्या सक्षमीकरणाची कामे कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी सोलापूर येथील बैठकीत दिले आहेत.
शुक्रवारी (दि.३) दुपारी सोलापूर शहरातील डीपीडीसी सभागृहात श्री. ताकसांडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. सुनिल पावडे, प्रभारी अधीक्षक अभियंता श्री. मनोज पेठकर यांच्यासह सोलापूर मंडलातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते व इतर अधिकारी उपस्थित होते.

( लोणी देवकर येथील उपकेंद्रात वृक्षारोपण करताना महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे मुख्य अभियंता सुनील पावडे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील व अभियंते)
संचालक श्री. संजय ताकसांडे म्हणाले, शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ ची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरु केली आहे. सौर प्रकल्पासाठी लागणाऱ्या गायरान जमीनी शासनाकडून १ रुपया नाममात्र दरात करारावर उपलब्ध झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु असून, लवकरच निविदा प्रसिद्ध होईल. जिल्ह्यातील २९ उपकेंद्रांना शंभर टक्के (९९४ एकर) जागा मिळालेल्या आहेत तर ५० उपकेंद्रांना अंशत: (७६५ एकर) जागा मिळाल्या आहेत.

(कौतुक करताना)
ज्या उपकेंद्रांची सौर प्रकल्पासाठी निवड झाली आहे अशा सर्व उपकेंद्राच्या सक्षमीकरणाची कामे महावितरणने हाती घेतली आहेत. ही कामे कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावयाची आहेत. यामध्ये उपकेंद्राना अद्ययावत करणे, तांत्रिक दुरुस्ती व सुधारणा, स्थापत्य कामे व इतर सक्षमीकरणाची कामे युद्धपातळीवर करावीत. सर्व कामे वेळेत व चांगल्या प्रकारे होण्यासाठी अभियंत्यांनी जातीने लक्ष द्यावे. निष्काळजीपणा अथवा हयगय झाल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल असा इशारा श्री. ताकसांडे यांनी दिला.
वीज उपकेंद्रांची पाहणी
सोलापूर दौऱ्या दरम्यान संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर व माढा तालुक्यातील मिटकलवाडी येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रांची पाहणी केली. उपकेंद्रातील यंत्रणा सक्षमीकरण कामांचे त्यांनी कौतुक सुद्धा केले. तसेच दोन्ही ठिकाणी श्री. ताकसांडे यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
