दिनांक २४ नोव्हेंबर

इंदापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकोटीला आला असताना दुधाचे दर दिवसेंदिवस कमीच होत आहेत, यासाठीच दुधाला योग्य दर व हमीभाव मिळण्यासाठी शिवधर्म फाउंडेशन ही सामाजिक संघटना राज्यभर आंदोलन करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष दीपक (अण्णा) काटे यांनी आज (दि २४) नरसिंह पूर येथे जाहीर केले.

नरसिंहपूर येथे शुक्रवार (दि२४) रोजी दूध उत्पादक शेतकरी यांच्यासह नरसिंह चरणी दुग्धाभिषेक करून शासन, दूधदर नियंत्रण मंडळ व खाजगी दूध संघ चालक यांना दूध दरवाढीसाठी सद्बुद्धी मिळो असे नरसिंह चरणी साकडे घातले यावेळी ते बोलत होते.ते पुढे बोलताना म्हणाले की माझ्या शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना त्यांच्या कष्टाचे घामाचा योग्य मोबदला व दुधाला हमीभाव मिळावा यासाठी नरसिंह चरणी आज आम्ही साकडे घातले आहे. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की दूध दर नियंत्रण मंडळावर जे नियुक्त केलेले कोणी असेल त्यांना दूध उत्पादकांच्या समस्या माहित आहेत का ? ते थंडगार एसी मध्ये बसून दुधाचा दर निश्चित करतात हे अतिशय खेदजनक आहे. केंद्र सरकारचा दर व राज्य शासन देत असलेला दर यांच्यामध्ये तफावत असून याचाच फायदा खाजगी दूध संघ चालक घेत आहेत.
कालच खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर दौऱ्यानिमित्त तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दूध दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला आहे, हा मुद्दा अतिशय योग्य आहे परंतु राज्यातील बहुतांश खाजगी दूध संघ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जवळीक असणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आहेत निवेदन देण्यापेक्षा त्यांनाच दुधाला योग्य भाव देण्यासाठी सांगितले तर प्रश्न आपोआप मिटेल.
शासन, दूध दर नियंत्रण मंडळ, व खाजगी दूध संघ चालक यांनी येत्या एक डिसेंबर पर्यंत दूध दराचा प्रश्न सोडविला नाही तर शिवधर्म फाउंडेशन राज्यभर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून आंदोलन करणार आहे. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणीची कैफियत माडली.
यावेळी शेतकरी व हजारो दूध उत्पादक उपस्थित होते.
