दिनांक २५ नोव्हेंबर

इंदापूर : लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष लहूश्री मातंग हृदय सम्राट विष्णू भाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी पुणे ते नागपूर आरक्षण क्रांती पदयात्रा १६ नोव्हेंबर पासून आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे तालीम गंजपेठ पुणे येथून सुरुवात होऊन दिनांक १३ डिसेंबर रोजी यशवंत स्टेडियम नागपूर येथे पोहोचणार आहे.या पद यात्रेचे रूपांतर भव्य मोर्चात होणार आहे. तरी या पदयात्रेत समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने आपल्या न्याय हक्कासाठी सामील होण्याचे आवाहन लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश सचिव दत्ताभाऊ जगताप यांनी केले आहे.

अनुसूचित जाती गटातील एकत्रित असलेल्या १३ टक्के आरक्षणाची अ, ब, क, ड नुसार वर्गवारी करून मातंग समाजासह उपेक्षित वंचित जातींना आरक्षणाचा लाभ द्यावा, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा व मुंबई विद्यापीठास त्यांचे नाव देण्यात यावे, बार्टीच्या धरतीवर आर्टी या शैक्षणिक संस्थेची स्थापना करण्यात यावी, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगासाठी आयोगातील शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास एक हजार कोटी भाग भांडवल उपलब्ध करून महामंडळ तत्काळ सुरू करावे, आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांच्या संगमवाडी येथील समाधी स्थळी स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यासाठी लहुजी शक्ती सेना नागपूरला जाऊन धडकणार आहे.
सदर मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर निवेदनातील नमूद मागण्या सरकारने तात्काळ मान्य न केल्यास लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे व प्रदेशाध्यक्ष कैलास दादा खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याची प्रदेश सचिव दत्ताभाऊ जगताप यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाच्या अनेक मागण्यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. परंतु आजपर्यंत समाजाच्या मागण्यांबद्दल राज्य सरकारकडून कोणत्याही ठोस स्वरूपाची अंमलबजावणी झाली नाही.यावेळी मात्र सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी लढा अधिक आक्रमकपणे उभारणार असल्याचे लहुजी शक्ती सेनेच्या प्रदेश सचिव दत्ताभाऊ जगताप यांनी यावेळी सांगि
तले.
