प्रकाश आरडे : स्वराज्य न्यूज

रिपब्लिकन नेते संजय भैय्या सोनवणे यांनी सरडेवाडी टोल प्रशासनाविरोधात घेतलेल्या आक्रमक तोडफोड आंदोलना संदर्भात पोलीस प्रशासन, टोलप्रशासनासहि तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी दिनांक २८ सप्टेंबर रोजी त्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते.
सदर बैठकीसाठी टोल प्रशासनातील सरडेवाडी टोलचे व्यवस्थापक व पाटस टोलचे वरिष्ठ व पोलीस निरीक्षक टि. वाय. मुजावर यांच्यासह आंदोलकाच्या मागण्यासंदर्भात चर्चेचे आयोजन तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी आपल्या कार्यालयात केले होते.चर्चेच्या प्रारंभीच टोल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आंदोलकाचे काही मुद्दे आमच्या अधिकारात येत नसल्याचे सांगताच तहसीलदार यांनी तुम्हाला अधिकार नसतील तर जबाबदार अधिकाऱ्यांसह चर्चेला यावे असा सल्ला दिल्याने कालची बैठक निष्फळ ठरली.
टोल तोडफोड आंदोलनाचे संयोजक रिपब्लिकन नेते संजय भैय्या सोनवणे यांनी आक्रमक पवित्रा घेऊन सांगितले की प्रत्येक वेळी चर्चा करीत असताना हे अधिकारी जबाबदारी झटकतात. यांना फक्त प्रवाशांकडून पैसा हवा आहे हे अधिकारी आमच्या प्रत्येक मुद्द्यावर नकारार्थी उत्तर देऊन टोलवाटोलवी करतात व प्रवाशांच्या जीवाशी खेळतात हे योग्य नाही. प्रत्येक वेळी आमच्या मागण्यात अवास्तव नसताना देखील हा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतात असे हाताश पद्धतीने उत्तर देतात,यांचे वरिष्ठ कोण आहेत ? त्यांना चर्चेला बोलवा आम्ही आणखी यांना संधी देण्यास तयार आहोत असा पवित्र घेतलेने शेवटी तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी पुढील बैठक निर्णय घेणारे प्रमुख टोल प्रशासनातील अधिकाऱ्यांसह येत्या सोमवारी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल असे जाहीर केले.
…….. चौकट…….
तसे पाहता आंदोलकाच्या मागण्या प्रवाशाच्या जीविताशी निगडित आहेत. त्यावर उपाययोजना करणे हे टोल प्रशासनाची जबाबदारी असताना देखील टोल व्यवस्थापक हताशपणे प्रत्येक वेळी उत्तरे देतात हे योग्य नाही असे संतापजनक उद्गार सरडेवाडी टोल तोडफोड आंदोलनाचे संयोजक रिपब्लिकन नेते संजय भैया सोनवणे यांनी स्वराज्य न्यूज शी बोलताना काढले. शेवटी असेही म्हणाले की येत्या सोमवारी जर यावर समाधानकारक तोडगा न निघाल्यास आम्ही आमचे आंदोलन करणारच .कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी टोल प्रशासनाची व संबंधित प्रशासनाची राहील.
