इंदापूर : ग्रामीण भागातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व दैनंदिन प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card) व एसटी स्मार्ट कार्ड सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी इंदापूर तालुक्यातील प्रत्येक एसटी बसस्थानक, प्रमुख स्टँड तसेच गावागावात विशेष नोंदणी व वितरण कॅम्प आयोजित करण्यात यावेत, अशी मागणी जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटना, इंदापूर तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात इंदापूर एसटी आगारप्रमुख गोसावी साहेब यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, एसटी स्मार्ट कार्ड व NCMC योजना ही डिजिटल व्यवहार, आधुनिक तिकीट व्यवस्था व भविष्यातील एकात्मिक प्रवास व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असून ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना अद्याप या योजनेची पुरेशी माहिती व सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत.
तालुक्यातील अनेक गावे मुख्य केंद्रांपासून दूर असल्याने नागरिकांना केवळ कार्ड नोंदणी व वितरणासाठी वारंवार एसटी आगारात जावे लागत असून वेळ, पैसा व श्रम यांचा अपव्यय होत आहे. त्यामुळे गावागावात विशेष नोंदणी कॅम्प, फिरते मोबाईल नोंदणी केंद्र, ग्रामपातळीवर सुविधा केंद्र तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र नोंदणी व्यवस्था सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात अथवा विशेष शुल्क माफी योजनेंतर्गत कार्ड उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत, नगर परिषद व एसटी प्रशासनाच्या समन्वयातून जनजागृती मोहीम राबवावी व प्रशासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन विशेष मोहीम सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शत्रुघ्न घाडगे, अध्यक्ष – जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटना, इंदापूर तालुका तसेच तानाजी खैरे, ऊर्जा प्रमुख – इंदापूर तालुका उपस्थित
होते.
