इंदापूर : (दि.२५ ) हिंगणगाव चे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा स्वर्गीय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे खंदे समर्थक पांडुरंग दिगांबर देवकर यांचे आज (दि.२५ ) रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
शिवकृपा पाणीपुरवठा सहकारी संस्था ही तालुक्यात सर्वात मोठी पाणीपुरवठा संस्था स्वर्गीय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग देवकर यांनी नावारूपाला आणली होती. हिंगणगाव मधील सर्व जिरायती क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी त्यांनी शेतकरी ग्रामस्थांना एकत्र करून या संस्थेची स्थापना केली. कर्मयोगी शंकरराव पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती. इंदापूर अर्बन बँकेचे माजी संचालक कै.शरद देवकर यांचे ते चुलते होते.
कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या सक्रिय राजकारणात ते विश्वासू व खंदे समर्थक म्हणून अखेरपर्यंत त्यांच्यासोबत होते. हिंगणगाव व पंचक्रोशीत त्याचबरोबर तालुक्यात त्यांचा दांडगा संपर्क होता. पंचक्रोशीत त्यांना दादा म्हणून ओळखले जात. संयमी राजकारणी म्हणून त्यांची ख्याती होती. विरोधक देखील त्यांना सन्मानपूर्वक वागणुक देत.मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांना देखील सुरुवातीच्या राजकारणात त्यांनी खंबीर साथ दिली. मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत सुद्धा त्यांचे सलोख्याचे संबंध होते. अशा या निष्ठावंत गांधीवादी विचारसरणीचा राजकारणी आज काळाच्या पडद्याआड गेला.
ही बातमी समजतात हिंगणगाव व पंचक्रोशीत दुःखाचे सावट पसरले सर्व परिसर शोकसागरात बुडाला.हि बातमी समजताच शेतकरी कष्टकरी व्यवसायिक यांनी आपापले उद्योग बंद करून त्यांच्या राहत्या घराकडे एकच धाव घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा, सुन,नातवंडे,व चार विवाहित मुली व नातवंडे असा परिवार आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ९६ वर्ष होते.
