इंदापूर : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीचा प्रचार जोरदार सुरु असुन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष व कृष्णा भीमा विकास आघाडी मध्ये प्रमुख लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षा तर्फे भरत शहा तर कृष्णा भिमा विकास आघाडीतून प्रदीप गारटकर नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात जवळजवळ सर्वच प्रमुख राजकीय पक्ष एका बाजूला असल्याचे दिसत आहे. आरोप प्रत्यारोप एकमेकांचे प्रतिस्पर्धी करीत आहेत. प्रचार अंतिम टप्प्यात असून वातावरण ढवळून निघालेले चित्र आहे. कट्टर राजकीय वैरी एकमेकांना साथ देत आहेत, तर निष्ठावंत निवडणूक प्रक्रियेपासून लांबुनच हाताश होऊन पहात आहेत. अति उत्साही कार्यकर्ते व अनेक इच्छुकांच्या स्वप्नांच्या चिंधड्या उडाल्याचे चित्र आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व इतर नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी प्रचारात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, आरपीआयचे शिवाजीराव मखरे बाळासाहेब सरवदे, यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शेठ शहा व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांनी घर टू घर जोरदार प्रचार करून शहर ढवळून काढले आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेठी बरोबरच घोंगडी बैठक व सभेचे नियोजन केले आहे. तर कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांनीही नियोजनबद्ध प्रचाराची आखणी केल्याने निवडक व विश्वासू सहकार्यासमवेत घर टू घर प्रचार करुन संपूर्ण शहरात प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचून येणाऱ्या काळात करण्यात येणारा विकास पटवून सांगत आहेत. कृष्णा भीमा विकास आघाडी साठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्य व सोनाई परिवाराचे संचालक प्रवीण माने, माजी आमदार यशवंत माने, हे प्रामुख्याने आक्रमकपणे व नियोजनबद्ध प्रचार करीत असल्याचे चित्र आहे. प्रदीप गारटकर हे अनुभवी राजकारणी असून आक्रमक व नियोजनबद्ध निवडणूक प्रक्रिया राबविणारे राजकारणी म्हणून तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्याला परिचित असल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे.

दोन्ही बाजूंनी आपलेच उमेदवार विजयी होणार असल्याचे ठासून सांगितले जात आहे. दोन डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदाना दिवशी मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपले बहुमूल्य मत टाकतोय हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *