इंदापूर : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टीलरी लि.कडून शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. परिणामी, चालू गळीत हंगामामध्ये उच्चांकी रु. ३३५० प्रति टन दर जाहीर करण्यात आला आहे. आता कारखान्याचा अडचणीचा काळ संपला असून, आगामी काळात कारखाना प्रत्येक वर्षी उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम राखेल, असे गौरवोद्गार कारखान्याचे अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि. ११) काढले.

महात्मा फुलेनगर (बिजवडी) ता. इंदापूर येथे कारखाना कार्यस्थळावर आयोजित शेतकरी सभासद सुसंवाद कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी उच्चांकी ऊस दर रु. ३३५० दिलेबद्दल कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील यांचा सत्कार कारखान्याचे सभासद शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार यांच्या वतीने उत्साही वातावरणामध्ये करण्यात आला. प्रारंभी कर्मयोगी श्रद्धेय शंकररावजी पाटील उर्फ भाऊंच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नीरा भीमाच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, ओंकार ग्रुपच्या रेखाताई बोत्रे पाटील उपस्थित होत्या.

हर्षवर्धन पाटील भाषणात पुढे म्हणाले, या कारखान्याच्या उभारणीसाठी सन १९८५ – ८६ च्या सुमारास कर्मयोगी भाऊंसमोरही अडचणी निर्माण करण्यात आल्या. तर सन १९९५ ला मी आमदार होऊन राज्य मंत्रिमंडळात समावेश झालेवर तिसऱ्याच कॅबिनेटमध्ये कारखान्याला खास बाब म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी रु. ९.५० कोटीचे शासकीय भांडवल मंजूर केले, त्यामधून कारखान्याचा विस्तार करण्यात आला. पुढे सन २०१२ मध्ये चेअरमन म्हणून माझ्या खांद्यावर कारखान्याची जबाबदारी आली. सन २०१२ ते २०१४ पर्यंत काही अडचण नव्हती कारण आपण सरकारमध्ये सत्तेवर होतो. मात्र त्यानंतर दुर्दैवाने सन २०१४, २०१९ व २०२४ ला राजकीय अडचणी आल्या. त्यावेळी विरोधक आमच्या संस्थांवर नाहक टीका करायचे. गेली ११ वर्ष आपल्याकडे राजकीय राजाश्रय नाही तरीही आपण डगमगलो नाही. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माध्यमातून आमच्या कारखान्यांची आडवणूक करायची व दुसऱ्या बाजूला आमचेवर टीका करायची, अशी दुप्पटी भूमिका विरोधक घेत होते. तुंम्ही आमच्या कारखान्यावर कर्ज आहे अशी टीका करता मग तुमच्या कारखान्यावर १२ वर्षात ६५० कोटी रुपयाचे कर्ज का केले. आपलं ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याच… या शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी लोकप्रतिनिधींवर टीका केली.

नीरा भीमा कारखान्यास इथेनॉल कर्जासाठी रु. २० कोटी भरा मग रु. ५० कोटी कर्ज देऊ असे सांगितले. मात्र नंतर कर्ज न देता आडवणूक केली. नंतर बँकेने आम्हाला एक पत्र पाठवले, त्यात लिहिले आहे भविष्यकाळात नीरा भीमा कारखाना तोट्यात जाऊ शकतो म्हणून तुमचं कर्ज ना मंजूर करत आहोत. आता बँकेच्या अध्यक्षांनी कारखाना उत्कृष्टपणे चालू आहे ते पहावे.

या बँकेवर तालुक्यातून दोन संचालक आहेत जे बिनविरोध जातात, आम्ही त्यांना तीन वेळा बिनविरोध केले. तुमची जबाबदारी नाही का? एन.सी.डी.सी. 8 टक्क्याने कर्ज देत असेल तर का जिल्हा बँक ११ ते ११.३० टक्के व्याज दर लावते, असे का, असे ते म्हणाले.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, इंदापूर बाजार समिती निवडणुकीत सन २०१७ ला तुंम्ही मतपत्रिका खाऊन निवडून आला. आता मत चोरी होते असे म्हणतात हे तर मतपत्रिका खाऊन २ ते ३ मताने निवडून आले. नाहीतर आपल्याकडेच बाजार समिती राहिली होती.

मी म्हणून मंत्री असताना या बाजार समितीला खासबाब म्हणून पणन कडून सबशिडी दिली. फिश मार्केट केलं, ते फक्त एकाच इंदापूरच्या बाजार समितीत आहे, त्यासाठी कायदा बदलला. आज रत्नागिरी सिंधुदुर्ग पासून व्यापारी इंदापूर फिश मार्केटमध्ये येतात, हे आंम्ही उभा केलं. २५ एकर जागा आंम्ही बाजार समितीसाठी घेतली. आज बाजार समिती तुमच्या ताब्यात आहे, काय अवस्था आहे, डाळिंबाचं मार्केट बंद झाल.

इंदापूर खरेदी विक्री संघाची पाच दहा कोटीची प्रॉपर्टी आपण निर्माण केली. खरेदी विक्री संघात एक माणूस नोकरीस आहे, अशाप्रकारे संस्था तुंम्ही चालवताय. छत्रपती कारखाना तुम्ही चालवताय, अन आरोप मात्र दुसऱ्यावर करताय..असा टोला हर्षवर्धन पाटील यांनी विरोधकांना लगावला.

पृथ्वीराजबापू जाचक अतिशय चांगला माणूस आहे. २२ वर्षे धुऊन खाल्ल्यानंतर आता बापूच्या गळ्यात भवानीनगर कारखाना घातलाय, तिथे अनावश्यक मोठ्या नोकर भरतीमुळे पगारावर कित्येक कोटी रुपये खर्च होत आहेत. राज्याचे नेतृत्व करणारी माणसं अशी वागायला लागली तर संस्था, शेतकरी याचे काय भविष्य राहणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

यावेळी भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, साखरेचा दर प्रति किलोस रु. ४१ करावा, अशी शिफारस राज्य शासनकडून केंद्र सरकारला करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मान्यता दिली आहे. तसेच भाषणात त्यांनी राज्य व देशातील साखर उद्योगातील समस्या व भविष्याचा आढावा घेतला. तसेच तालुक्यात येणाऱ्या भविष्यकाळात परिवर्तन झालेशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना बाबुराव बोत्रे पाटील म्हणाले, सहयोग तत्वावर कारखाना चालवण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांचा मोठा अभ्यास आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच कर्मयोगी कारखाना व ओंकार ग्रुप मध्ये शेतकरी हितासाठी सहयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला ऊस दर मिळत आहे. कारखान्यास शेतकऱ्यांनी चांगला प्रतीचा ऊस घातला पाहिजे, चांगले गाळप झाले पाहिजे. परिणामी, कोणीही आमचे एवढा चांगला ऊस दर देऊ शकणार नाही. कारखान्यात आपला सर्व ऊस द्या, आम्ही जास्तीत जास्त ऊस दर देऊ, असे आवाहनही भाषणात बाबुराव बोत्रे पाटील यांनी केले.

यावेळी निरा भिमा कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी भाषणामध्ये बोलताना उच्चांकी ऊस दर दिलेबद्दल कर्मयोगी कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, बाबुराव बोत्रे पाटील यांचे अभिनंदन केले. दिलेल्या उच्चांकी ऊस दरामुळे श्रद्धेय भाऊंचे शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे, असे नमूद केले. नीरा भीमा कारखान्याचे चालू हंगामामध्ये ७ लाख मे. टन व कर्मयोगी कारखान्याचे १२ लाख मे. टन ऊस गाळपा उद्दिष्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस या दोन्ही कारखान्यांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन भाग्यश्री पाटील यांनी याप्रसंगी केले.

प्रास्तावित कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी केले. यावेळी राघव व्यवहारे, राजेंद्र पवार, निलेश देवकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास रेखाताई बोत्रे पाटील, राजवर्धन पाटील, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे आदी मान्यवरांसह कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भिमा कारखान्याचे संचालक, विविध संस्थांचे चेअरमन/व्हा. चेअरमन, पदाधिकारी, कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी सभासद, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.

चौकट:-

कृषिमंत्र्यांनी दिवाळीला शेतकऱ्यांना ऊस बिल का दिले नाही?

———————————-

आंम्ही कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भिमा या दोन्ही कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवाळीला रु. १०० प्रमाणे ऊस बिलाची रक्कम दिली. मात्र कृषी मंत्री असलेल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी छत्रपती कारखान्याच्या माध्यमातून दिवाळीला शेतकऱ्यांना ऊस बिल का दिले नाही? कृषीमंत्री असूनही तुम्हाला दिवाळीला शेतकरी का आठवला नाही? असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी केला.

•चौकट:-

कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भिमा कारखान्यास सर्व ऊस द्या; ऊस गाळपासाठी घाई न करण्याची विनंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *