दिनांक  १८ जून 

 

इंदापूर : लोकसभा निकालानंतर त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातायत. तसेच या निकालामुळे पुढील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो याचा अंदाज बांधला जात आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या महाविकास आघाडीने ३१ जागा जिंकले आहेत तर महायुतीने १७ जागा जिंकले आहेत. प्रत्यक्षात ही लढत कमालीची महाविकास आघाडी व महायुती यांच्यात झाली आहे हे निकालावरून स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दहा वर्षापासून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय संघर्ष झाल्याचे दिसत आहे. या खेळांमध्ये कधी देवेंद्र फडणवीस बाजी मारतात तर कधी शरद पवार. आता लोकसभेच्या निकालावरून शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना धोबीपछाड दिला आहे. पक्ष फुटला असला तरीही भाजपाचे आव्हान शरद पवार यांनी कसे परतवून लावले याच्या राजकीय कहाण्या वरचेवर ऐकायला मिळत आहेत. शरद पवार यांनी पडद्यामागून बरेच प्यादे निवडणुकीच्या सरीपाटावर कसे समोर आणले हेच दिसत आहे. 

           मागील काही वर्षापासून शरद पवार हे राज्यातील सर्व राजकीय पक्ष चालवितात अशीच राजकीय वर्तुळात चर्चा होती. पूर्वी काँग्रेसमध्ये असताना व पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर राज्यातील राजकारणावर शरद पवार यांचा प्रभाव राहिला आहे. त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्याचे मुख्यमंत्रीपद कधीच मिळाले असते परंतु त्यांनी जाणून-बुजून मुख्यमंत्री पद न घेता महत्त्वाची खाती ताब्यात ठेवून राज्याच्या राजकारणात आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रस्थानी ठेवला. 

आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकूण दहा जागा लढवून आठ जागा जिंकून आपला राजकारणातील प्रभाव दाखवून दिला आहे. येणाऱ्या विधानसभेत व स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील हा प्रभाव टिकवून ठेवणार का ? हे येणार्या विधानसभेत दिसून येईल. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुक देखील अतिशय चुरशीची व अटीतटीची होणार हे त्रिवार सत्य आहे. यात शरद पवार बाजी मारणार की देवेंद्र फडणवीस हे विधानसभेला दिसून येणारच आहे. तोपर्यंत पक्ष बदलाची लाट भयंकर मोठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *