दि. १४ नोव्हेंबर

इंदापूर : लहुजी साळवे हे क्रांतीकारक होते.ते लहुजी वस्ताद या नावाने प्रसिद्ध होते .त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ रोजी पेठ पुरंदर येथे झाला, व मृत्यू १७ फेब्रुवारी १८८१ ला पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे तर आईचे नाव विठाबाई होते ते आजन्म अविवाहित होते.
इ. स. ५ नोव्हेंबर १८१७ रोजी पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. १२ दिवस वडिल राघोजी व २३ वर्ष वयाच्या लहुजी यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजा विरुद्ध प्रखर लढा दिला.लहुजींचे वडील राघोजी साळवे वाऱ्याच्या वेगाप्रमाणे शत्रूवर तुटून पडले होते व शत्रुवर तलवारीचे वार सपासप करत शत्रूंना जमिनीवर लोळवत होते . अखेर या संकटातून बाहेर पडण्यासाठी घाबरलेल्या इंग्रजांनी एकत्र वार करून राघोजींना संपवले.
वडील राघोजी या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. पुढे इ. स. १८८१ मध्ये मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज शनिवार वाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियनच्या फडकला.
या पराभवानी लहुजी च्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. स्वातंत्र्यप्रेम ,देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरले. आपल्या वडिलांना आपल्या डोळ्यासमोरच शहीद झालेले पाहून लहुजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली व भारत मातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ” मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी” अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांचे समाधी उभारली. ही समाधी अजूनही पुणे येथे शिवाजीनगर जवळच्या वाकडेवाडी येथे आहे.
दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी ,घोडेस्वारी, बंदूक चालवणे, निशाणेबाजी या सर्व युद्ध कलेमध्ये लहुजीं निपुण होते. लहुजींचे पिळदार शरीर व त्यांची भरलेली छाती पाहून शत्रूला सुद्धा घाम फुटत असे. जीवघेण्या शस्त्रा बरोबर ते अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असत. आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असाहय झाला.पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक निर्माण करण्याची ठरविले .त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्ध कलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी १८२२ मध्ये रास्ता पेठ पुणे येथे देशातील पहिली तालीम युद्धकला कौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्व समाजातील युवक तालीम करण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले ,गोपाळ गणेश आगरकर, चाफेकर बंधू, क्रांती भाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे,रावबहादुर सदाशिवराव गोवंडे,नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो, विठ्ठल बाळवेकर ,क्रांतिवीर नाना छत्रे ,महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.
२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवून फडके यांना देवरनावडगा येथे मुक्कामी असताना रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजदृोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ साली वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर या घटनेचा खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी १७ फेब्रुवारी १८८१ ला पुण्याच्या संगमवाडी परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवे यांची प्राणज्योत मालवली. एका महाक्रांती पर्वाचा शेवट झाला. त्यांची समाधी संगमवाडी पुणे येथे आहे.
इ. स. १८४८ साली लहुजींच्या तालमीत सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भरत होती. लहुजी साळवे यांचे कार्य शिक्षणासाठी अतिशय महत्त्वाचे होते. सावित्रीबाई फुले यांना उच्चवर्णीय त्रास देत होते, तेव्हा लहुजी साळवे सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते.
