दि. २३ ऑक्टोबर
*इंदापूर तालुक्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागणार, उसाचे एक टिपरूही शिल्लक राहणार नाही असे जबरदस्त नियोजन पक्षाच्या माध्यमातून करण्यात आले आहे*

इंदापूर : येत्या मंगळवारी (दि.२५) शेतकऱ्याचा जाणता राजा ज्येष्ठ नेते शरद पवार इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली गावात शेतकऱ्यांसह समाजातील विविध घटकाशी थेट संवाद साधण्यासाठी व अडीअडचणी समजून घेण्यासाठी येणार आहेत, तरी शेतकऱ्यांसह व्यापारी उद्योजक व अनेक क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या अडचणी थेट शरद पवार साहेबांना सांगाव्यात जेणेकरून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करता येईल असे आवाहन प्रदीप गारटकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
यावेळी बोलताना प्रदीप गारटकर म्हणाले की , इंदापूर तालुक्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न फार मोठा आहे शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचे नियोजन पक्षाच्या माध्यमातून वरिष्ठाशी बोलून केले आहे. येत्या हंगामात तालुक्यातील शेतकऱ्याचा ऊसाचे टिपरू ही शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही यासाठी शेजारील कारखान्याने अतिरिक्त असणारा ऊस गाळपासाठी घेऊन जाण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. मागील काही दिवसात यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळासह ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांना यावर उपाययोजना करण्याची विनंती केली होती त्यानुसार बारामती येथे बारामती अॅग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तालुक्यातील दहा लाख टन ऊस हा अंबालिका, दौंड शुगर, बारामती अग्रो , माळेगाव कारखाना यांनी तालुक्यातून तोडणी करून गाळप करण्याचे नियोजन निश्चित केले आहे . त्यासाठी दिवाळीनंतर संबंधिताशी एक बैठक घेऊन नियोजन करणार आहे या नियोजनामुळे इंदापूर मधील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्याची ऊस तोडणी साठी होणारी दमछाक थांबणार आहे .पुढे बोलताना प्रदीप गारटकर म्हणाले की ज्येष्ठ नेते शरद पवार व संपूर्ण पवार कुटुंबीय दिवाळीनिमित्त बारामती येथे असतात.आम्हा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन एक दिवस आपल्या तालुक्यासाठी शेतकऱ्यांसह विविध घटकांच्या प्रश्नावर थेट संवाद साधण्यासाठी विनंती केल्याने येत्या मंगळवारी ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार चेअरमन बारामती अग्रो, आमदार रोहित पवार, आपले आमदार दत्तात्रय भरणे, बाळासाहेब तावरे चेअरमन माळेगाव कारखाना, प्रशांत काटे चेअरमन छत्रपती कारखाना भवानीनगर, व तालुक्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत ,तरी शेतकऱ्यांसह विविध घटकांच्या प्रश्नावरती थेट संवाद साधण्यासाठी आपले प्रश्न घेऊन येत्या मंगळवारी शेटफळ हवेली गावात दुपारी एक वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी केले.
यावेळी हनुमंत कोकाटे इंदापूर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
