२४ वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर १२ वीची परीक्षा उत्तीर्ण होणे ही केवळ शैक्षणिक यश नसून जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा एक मोठा विजय आहे. माणसाने जर ठरवले तर वयाचे कोणतेही बंधन त्याला अडवू शकत नाही, याचाच प्रत्यय एका जिद्दी तब्बल २४ वर्षांच्या खंडानंतर बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे, ही बाब अनेकांसाठी अशक्य वाटू शकते, पण इच्छाशक्तीच्या जोरावर ही गोष्ट शक्य होऊ शकते.

 

निमगाव केतकी तालुका इंदापूर येथील रहिवासी असणार व दैनिक लोकमतचे झुंजार पत्रकार निलेश भोंग यांच्या संघर्षाची हि कहानी आहे. स्वराज्य न्यूजशी बोलताना ते म्हणाले कौटुंबिक जबाबदाऱ्या, वडिलांचा दवाखाना, आर्थिक परिस्थिती आणि मानसिक तणाव त्याचप्रमाणे इतर काही वैयक्तिक कारणांमुळे २४ वर्षांपूर्वी शिक्षणाचा प्रवास अर्ध्यावरच सुटला होता. संसाराचा गाडा ओढताना आणि नोकरी-व्यवसायात व्यस्त असताना पुस्तकांशी असलेला संपर्क तुटला होता. मात्र, मनात कुठेतरी एक सल कायम होती— ‘आपले शिक्षण अपूर्ण राहिले.’

 

दोन दशकांहून अधिक काळ उलटल्यानंतर पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करणे सोपे नव्हते. बदललेला अभ्यासक्रम, नवीन परीक्षा पद्धत आणि हातात लेखणी धरण्याची सुटलेली सवय, असे अनेक अडथळे समोर होते. पण, “शिकण्याला वय नसते” या उक्तीवर विश्वास ठेवून परीक्षेचा अर्ज भरला आणि खऱ्या अर्थाने ‘दुसरी इनिंग’ सुरू झाली.

 

दिवसभराच्या व्यस्त कामातून किंवा रात्री थोडा वेळ मिळाल्यावर अभ्यास असा दिनक्रम सुरू झाला. पाहता पाहता परीक्षेचा दिवस आला. ज्या वेळेस मी वर्गात गेलो. मुले उठून उभी राहिली. त्यांना वाटले पेपर साठी शिक्षक आले परंतु मी माझा परीक्षा क्रमांक शोधून त्या ठिकाणी जाऊन बसलो आणि वर्गात एकच हसा पिकला. घरातील मुलांच्या वयाच्या विद्यार्थ्यांसोबत परीक्षा केंद्रावर बसताना थोडा संकोच वाटला. पण ध्येय स्पष्ट होते. डिजिटल युगातील नवीन विषयांचे आकलन करून घेणे हे मोठे आव्हान होते, मात्र जिद्दीपुढे तेही फिके पडले.

 

 

काल जेव्हा निकाल जाहीर झाला आणि ‘उत्तीर्ण’ असा शब्द स्क्रीनवर झळकला, तेव्हा तो आनंद शब्दांत मांडण्यापलीकडचा होता. हे यश केवळ माझे नसून, त्या प्रत्येकाचे आहे ज्यांना वाटते की आता वेळ निघून गेली आहे.

तुमची परिस्थिती किंवा तुमचे वय तुमचे भविष्य ठरवू शकत नाही. जर तुमच्यात शिकण्याची ओढ असेल, तर तुम्ही कधीही नवीन सुरुवात करू शकता. २४ वर्षांनंतरचे हे यश सिद्ध करते की, अपयश हे अंतिम नसते आणि शिक्षणाची कवाडे तुमच्यासाठी सदैव उघडी असतात.

“जिथे जिद्द असते, तिथे मार्ग आपोआप मिळतो. आज हे यश केवळ एका प्रमाणपत्रापुरते मर्यादित नसून, ते एका स्वप्नाच्या पूर्ततेचे प्रतीक आहे.”

खरंच स्वप्नांना वय नसते हेच अधोरेखित

झाले ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *