इंदापूर : तालुक्यातील हिंगणगाव येथे भैरवनाथ यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या जुन्या वादातून पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडली असून या घटनेत काही युवक गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी ओंकार मोहन आरडे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

         फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, गेल्या वर्षी गाडीच्या धुरळ्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्या वेळी झालेल्या भांडणाचा व्हिडिओ फिर्यादीच्या भावाने मोबाईलमध्ये शूट केला होता. याच जुन्या वादातून ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे.

        दि. 5 एप्रिल रोजी हिंगणगाव येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त मंदिराजवळ आर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम पाहून फिर्यादी ओंकार आरडे, त्यांचे भाऊ सुशांत आरडे व आनंद आरडे घरी जात असताना रात्रीच्या सुमारास भैरवनाथ मंदिराजवळील रस्त्यावर काही आरोपींनी त्यांना अडवले.

       त्यावेळी निखिल प्रशांत बगाडे, स्वप्नील प्रशांत बगाडे, समीर नानासाहेब वाघमारे व रोहन राजेंद्र भोसले यांनी फिर्यादीच्या भावाला मागील वर्षी व्हिडिओ काढल्याच्या कारणावरून धमकावत मारहाण केली. स्वप्नील बगाडे यांनी कोयत्याने आनंद आरडे यांच्या डोक्यावर वार केला, तर समीर वाघमारे यांनी लोखंडी रॉडने ओंकार आरडे यांच्या पायावर मारहाण केली.

        यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुशांत आरडे यांनाही मारहाण करण्यात आली असून त्यांच्या तोंडावर रॉडने मारहाण केल्याने त्यांचा दात पडला आहे.

       यानंतर प्रव्जल वाघमारे व चैतन्य ढाकले हे देखील घटनास्थळी आले. त्यांनीही शिवीगाळ करत फिर्यादी व त्यांच्या भावांना मारहाण केली तसेच हात-पाय तोडण्याची धमकी दिली. मारहाण करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

        जखमींना तत्काळ त्यांच्या कुटुंबीयांनी सरकारी रुग्णालयात दाखल करून उपचार केले. उपचारानंतर ओंकार आरडे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

      या प्रकरणी निखिल बगाडे, स्वप्नील बगाडे, समीर वाघमारे, प्रजल वाघमारे व चैतन्य ढाकले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

      या घटनेमुळे हिंगणगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *