प्रकाश आरडे : स्वराज्य न्यूज
इंदापूर
वालचंदनगर – बावडा रस्त्यावर कत्तलीसाठी निघालेल्या जनावरांचा टेम्पो पोलिसांनी सापळा रचून पकडला. आयशर टेम्पो व टेम्पोतील १२ गाई पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून टेम्पो व गाईची असा मिळून दहा लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी आज मध्यरात्री ही धडक कारवाई लाखेवाडी भागात केली.
पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी काल इंदापूरचा पुन्हा एकदा इंदापूरचा पदभार घेतल्यावर धडक कारवाईला प्रारंभ झाला. टी. वाय. मुजावर यांच्या इंदापूर कडे येण्याने अवैद्य धंदे करणाऱ्यांची बत्ती गुल झाली असून बेकादेशीर धंदे करणाऱ्यांची डोकेदुखी आता या निमित्ताने वाढली आहे. तर सर्वसामान्य नागरिक समाधानी झाला आहे.
बारामती ते सोलापूर जिल्ह्यात बावडा मार्गे अवैद्यरित्या कत्तलीसाठी आयशर टेम्पो मध्ये निर्दयतेने कोंबून जनावरे नेत असल्याची गुप्त माहितीवरून कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी टी.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी त्यांच्या सहकार्यांना बरोबर घेऊन वालचंदनगर ते बावडा रोड वरती लाखेवाडी भागात सापळा रुचून पोलिसांनी सदर टेम्पो (एम. एच. १३ सी. यु. ३००६) पकडला. या टेम्पोमध्ये असणारी ११ जर्सी गाई व ०१ देशी गाय ताब्यात घेण्यात आली.
आईशर टेम्पो चालक बंदेनवाज ख्वाजा शेख (वय २९ रा.मेखळी तालुका बारामती) व त्याचा साथीदार रमजान ख्वाजाभाई शेख (वय २५ रा. लासुर्णे ता. इंदापूर ) यास ताब्यात घेण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्या एकूण बारा गाईंची किंमत ९६०००/- व आईशर ट्रक ची किंमत १०,००,०००/- रुपये असा एकूण १० लाख ९६,००० र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बारा गाईंना पांजरपोळ्यामध्ये योग्य तो बंदोबस्तात जमा करण्यात आले.सदरचा आयशर टेम्पो बावडा दूरक्षेत्र येथे आणून प्राणी संरक्षण अधिनियम व इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या सह पोलीस नाईक सलमान खान, पोलीस नाईक कळसाईत, पो.कॉ. काळे,पो.कॉ.सय्यद यांनी केली.
