मी पाहिलेले गोकुळदास( शेठ)भाई….इंदापुर:- प्रकाश आरडे

 

इंदापूर मधील प्रसिद्ध कापड व्यवसायिक गोकुळदास (शेठ) भाई यांचे आज निधन झाले. इंदापूरच्या जडणघडणीचे फक्त साक्षीदारच नव्हेत तर इंदापूर शहरातील बाजारपेठ नावारूपाला आली ती भाईच्या कल्पक बुद्धीच्यातुर्यामुळेच. तसे पूर्वी आजच्या मानाने इंदापूर हे फार मोठे शहर नव्हतेच, पण त्या शहराची ख्याती शेजारील तालुक्यामध्ये मोठे कापड दुकान म्हणूनच नाव होते. लग्न कार्य छोटे असो की मोठे असो, घरी पाहुणे आले त्यांना कपडे घ्यायचे आहेत, नवरी ,नवरदेव यांची कपडे घ्यायचे आहेत,लग्नाचा बस्ता बांधायचा आहे…मग…चला इंदापूरला…..कुठे बसता बांधायचा आहे म्हणून कोणी विचारले की गोकुळ शेठच्या मोठ्या दुकानात. ..असे आवर्जून खेड्यातील माणसं सांगायचे. या दुकानाचा तालुका वासीय म्हणून खेड्यातील माणसांना जसा अभिमान वाटायचा तसाच पाहुण्यांना देखील खात्रीशीर किंमत व टिकाऊ कापड दुकान म्हणून याच गोकुळशेठ यांच्या दुकानाचा रस्ता अभिमान वाटायचा.हे सर्व गोकुळ शेठ यांच्या मनमिळावू स्वभाव व ग्राहकांची आवड निवड हे अचूक हेरलेल्या कल्पक बुद्धीला जाते. इंदापूर कारखान्याच्या जडणघडणीत शेठ चे योगदान फार मोठे आहे. कारखाना नवीन झाला त्यावेळी माझे वय शालेय जीवनातील….पण खेड्यापाड्यातील गाव पुढाऱ्यांबरोबर नेहमीच मी कमी वयापासून शंकरराव भाऊ व गोकुळ शेठ यांच्या सहवासात असायचो. शेतकऱ्यांनी आपला उत्पादित ऊस आपल्याच म्हणजे इंदापूर कारखान्याला गळपासाठी घालावा यासाठी सतत शेतकऱ्यांच्या संपर्कात भाई राहायचे ,मग शेतकऱ्याचा ऊस तोडणीसाठी रस्त्याचा प्रश्न असो,लाईटचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, तो सुटला पाहिजे ही त्यांची नेहमीच धारणा असायची व त्यासाठी ते सतत पाठपुरावा करायचे. शेतीच्या विषयावर अगदी मनमोकळेपणाने शेतकऱ्यांबरोबर तासनतास गप्पा मारायचे हे मी जवळून पाहिलेय. माझ्या कॉलेज जीवनामध्ये मोठे भाऊ म्हणजेच शंकररावजी पाटील ,गोकुळदास (शेठ) भाई, रमेश(काका) शुक्ला, शंकर (दादा) देवकर माळवाडी, गोपीचंद गलांडे (गलांडवाडी) , सुहास पाटील, रज्जाक पठाण( कांदलगाव) , व आणखी काही विश्वासू साथीदार यांच्या बरोबर दररोज दुपारी भाऊंच्या निवासस्थानी म्हणजेच कॉलेज शेजारील रेस्ट हाऊस वरती गप्पांच्या मैफिल असायच्या त्यावेळी या ज्येष्ठ मंडळींबरोबर राजकीय गप्पांबरोबरच शिक्षण, आरोग्य, नोकरी, शेतकऱ्यांचे प्रश्न ,सुशिक्षित मुलांनी काय केले पाहिजे या विषयावर भाई अतिशय तळमळीने बोलायचे. आज सुद्धा ते क्षण व प्रसंग जसाच्या तसा आठवतोय. बाकी काहीही असो पण गोकुळ(शेठ) भाईंचे साधे राहणीमान …उच्च विचारसरणी ….ही जीवनशैली मनाला भावली. …… (simply living & High thinking.. …M. K.Gandhi) !! गोकुळ (शेठ) भाईं भावपूर्ण श्रद्धांजली !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *