इंदापूर : लोकनेते प्रदिप दादा गारटकर यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम न करता सामाजिक व संघटनात्मक बळकटीकरणावर भर देण्याचे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. दरवर्षीप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असले तरी यावर्षी पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने वेगळ्या पद्धतीचा उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
त्याअनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी “वन बूथ – टेन युथ” हा उपक्रम हाती घेतला असून, प्रत्येक गावातील प्रत्येक बूथवर जाऊन संघटन विस्ताराचे काम सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक बूथवर १ बीएलए (Booth Level Assistant) तसेच १० कार्यकर्त्यांची निवड केली जात आहे. हा उपक्रम दिनांक २९ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत सात दिवस राबवण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर बूथस्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता गुरुकृपा सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रदिप दादा गारटकर मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
तसेच, वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी हार, तुरे, शाली किंवा पुष्पगुच्छ न आणता त्याऐवजी एखादे वाचनीय पुस्तक भेट द्यावे, असे आवाहन स्वतः प्रदिप दादा गारटकर यांनी केले आहे. ही पुस्तके शहरातील अभ्यासिका व वाचनालयांना देऊन युवक-युवतींना प्रेरणा देण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
तरी सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी या उपक्रमात व मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
