दि. २३ जुलै

– खडकवासल्याचेही लवकरच आवर्तन

– शेटफळ तलावही भरून घेणार 

इंदापूर: (२३ जुलै)  उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी भाटघरचे नीरा डावा कालव्यातून खरीप हंगामाचे आवर्तन रविवार (दि. 23) पासून सोडण्यात येणार आहे. तसेच खडकवासला धरणातूनही इंदापूर तालुक्यासाठी तातडीने आवर्तन सोडावे, असा निर्णय झाला आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.22) दिली. 

        शनिवार अखेर भाटघर धरणात 48 टक्के एवढा समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. इंदापूर तालुक्यात पाऊस लांबल्याने शेतातील पिके अडचणीत आली असून, पिण्याचे पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची कमतरता निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले तसेच पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डुबल यांच्याशी चर्चा होऊन भाटघर मधून नीरा डावा कालव्यामध्ये पाणी रविवार पासून सोडण्यात येणार आहे, सदरचे आवर्तने हे टेल टू हेड पद्धतीने इंदापूर तालुक्यातील 59 फाट्यापासून सुरू होईल. तसेच शेटफळ तलावात भरून घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याचप्रमाणे खडकवासला कालव्यातूनही इंदापूर तालुक्यासाठी शेतीसाठी तातडीने आवर्तन सोडण्याचा निर्णयही यावेळी सदर जलसंपदा अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेमध्ये घेण्यात आला आहे. नीरा डावा कालवा व खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाल्याने शेती बरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण आता राहणार नाही तसेच चाऱ्याचा प्रश्नही सुटणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *