दिनांक १० मे

इंदापूर : देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा तिसरा टप्पा सात मे रोजी पार पडला. आतापर्यंत या तिन टप्प्यात झालेल्या मतदानाचा विचार करता २०१९ च्या विधानसभा निहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी किंवा टक्केवारी पाहिल्यास मतदानाचा टक्का निश्चितच कमी झालेला दिसून येत आहे. हा कमी झालेला टक्का लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी घातक आहे म्हणजेच पर्यायाने लोकशाहीला धक्काच आहे. 

महाराष्ट्रात रखरखत्या उन्हात तापलेल्या राजकारणाची धग कोणत्या प्रमुख राजकीय पक्षासाठी धोकादायक ठरेल व कोणत्या प्रमुख राजकीय पक्षासाठी फायदेशीर ठरेल हे येत्या ४ जुन ला कळणारच आहे. पण बदललेली राजकीय समीकरणे व हे सर्व निमूटपणे सहन करणारा मतदार राजा निराश झालेला दिसून आला. निवडणूक प्रक्रियेत मतदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करून संसदेत पाठविणे लोकशाही जिवंत ठेवण्याचे लक्षण आहे परंतु, या निवडणुकीत मतदार काहीसा विचलित होऊन, भांबावलेल्या अवस्थेत आपले मत मांडू कुणासमोर ? असाच काहीसा दिसून आला. 

         विधानसभा निहाय नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत झालेल्या मतदानाचा विचार करता घटलेली टक्केवारी ही भविष्यात होणाऱ्या प्रमुख राजकीय पक्षासाठी निवडणुका कशा असाव्यात, उमेदवार कसे असावेत, पक्षाची ध्येय धोरणे काय असावीत, उमेदवारी निश्चिती वेळी मतदार राजाचा कौल आजमावणे गरजेचे आहे काय याचा विचार प्रमुख राजकीय पक्ष व नेते यांना करायला लावणारीच होती व आहे. मतदार राजाची प्रमुख राजकीय पक्षाविषयी व नेत्या विषयी असणारी निष्ठा कधीच इतिहास जमा झाली आहे काय ? असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडल्याशिवाय राहत नाही. 

एक मात्र निश्चित आहे लोकशाहीच्या या उत्सवांमध्ये निवडणुका ह्या निमित्त मात्र आहेत या निवडणुकात मतदार राजाने आपले मत नोंदविणे गरजेचे आहे तरच लोकशाही जिवंत राहणार आहे. जर आपल्या पसंतीचा उमेदवार नसेल तर नोटासारखा पर्याय मतदार राजा समोर असताना देखील मतदानाचा टक्का का घसरतोय याचा विचार प्रमुख राजकीय पक्षासाठी करायला लावणारी ही पार पडलेली निवडणूक आहे . यावर निश्चितच प्रमुख राजकीय पक्ष नेते व उमेदवार विचार करतील हीच माफक अपेक्षा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *