इंदापूर : इंदापूर विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे अशी चुरस निर्माण झाली आहे. इंदापूर विधानसभेसाठी उमेदवारी फॉर्म भरलेल्या प्रवीण भैय्या माने (अपक्ष), हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष), दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) या तीन उमेदवारांमध्ये अतिशय चुरशीची लढत होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील या दिग्गज व अनुभवी उमेदवारांसमोर नवखे असलेले प्रविण माने यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे, असे सध्या तरी दिसत आहे.
प्रविण माने यांनी उमेदवारी फॉर्म भरत असता समर्थांकांनी अतिशय मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून ग्रामदैवत बाबीर बुवा चा गुलाल हातात धरून काहीही झाले तरी फॉर्म काढणार नाही अशी भीमगर्जना करून समर्थकांमध्ये आशावाद निर्माण केलाय. तर त्या पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रचंड मोठे समर्थकांचे शक्ती प्रदर्शन करून आपणच निवडून येणार अशी ग्वाही देत समर्थकांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. लोगोलग तिसऱ्या दिवशी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रचंड शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
या तीनही उमेदवारांनी आपल्या समर्थकांचे मेळावे घेऊन प्रचंड जल्लोषात फॉर्म भरल्याने येणाऱ्या दिवसात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊन निवडणुकीतील चुरस वाढणार असल्याचे सध्यातरी चित्र आहे. नवख्या प्रवीण भैय्या माने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना इंदापूर तालुक्यातील उर्वरित कामे व सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी काम करणार असल्याचे जाहीर करून मी कोणावरही टीका टिप्पणी करणार नाही अशी हमी दिली. मात्र त्याच वेळी वडील सोनाई परिवाराचे सर्वेसर्वा दशरथ माने यांनी गेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीचा दाखला देऊन जिकडे आपण असो त्यांचाच विजय निश्चित असतो हे दाखले देत विधानसभा निवडणुक निकालानंतर प्रवीण भैय्या शिवाय मंत्रिमंडळ होऊच शकत नाही अशी गर्जना करून आपला इरादा स्पष्ट केला. याचमुळे दोन दिग्गज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय भरणे यांच्यासमोर नवख्या प्रवीण भैय्या माने यांचे कडवे आव्हान असणार हे स्पष्ट झाले आहे.
