प्रकाश आरडे

संपादक : स्वराज्य न्यूज 

इंदापूर : पत्रकार सुरेश मिसाळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने काल (दि.८) निधन झाले. हि बातमी समजताच पत्रकार, मित्र परिवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या शोकसागरात बुडाले. शहरासह तालुक्यात एकच चर्चा होती सुरेश तात्यांचे जाणे मनाला खटकत होते.

जन्म आहे म्हणजे त्या माणसाला मृत्यू देखील अटळ आहे. परंतु जन्म आणि मृत्यू यादरम्यान तो माणूस जगला कसा याला फार महत्त्व आहे.

सुरेश तात्या यांच्याबाबतीत देखील त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू आहेत त्यांचा बेधडक स्वभाव ठळकपणे जाणवतो. कुणाची ही भिडभाड न ठेवता जे पोटात आहे तेच ओटात अशा स्वभावाचे तात्या होते.

मी २००७ साली “इंदापूर आदर्श” या नावाचे साप्ताहिक चालु केले. त्या काळात बारामती,इंदापूर,दौंड भागातील अनेक साप्ताहिकांची छपाई पुणे येथील नरपतगिरी चौकात कोकणे यांच्या प्रेस मध्ये होत होती.

एक दिवस मी माझ्या साप्ताहिकाची छपाई करण्यासाठी पुणे येथे गेलो असता योगायोगाने सुरेश तात्या माझ्याबरोबर होते. त्या रात्री आम्ही पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी राहुन रात्री सर्व अंक छापून घेतले व दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय, सेंट्रल बिल्डिंग व सिंचन भवन या शासकीय कार्यालयांमध्ये अंक पोहोच केले. या धावपळीत मला एका अधीक्षक अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याचा फोन आला व त्यातील एका बातमी संदर्भात विचारणा केली व त्याच बरोबर समक्ष भेटण्यासाठी बोलावले. मी व सुरेश तात्या ताबडतोब त्या कार्यालयात गेलो. शिपायाला सविस्तर माहिती दिली व साहेबांनी आम्हाला भेटायला बोलावले आहे असे सांगितले. त्या शिपायाने आत साहेबांना निरोप दिला व आम्हाला आत बोलवताक्षणी पुणे शहरातील नामांकित एक आमदार साहेबांच्या भेटीसाठी आले हे पाहून मी प्रथम तुम्ही भेटता का मी आत जावु अशी विचारणा आमदार महोदयाना केली. त्याक्षणी त्या शिपायाने प्रथम आमदार साहेबांना भेटू द्या असे मला सांगितल्याने मी व सुरेश तात्या प्रतीक्षा रूम मध्ये बसलो . तब्बल एक ते दीड तास आम्हाला या गोंधळात भेटता आले नाही. त्यावेळी सुरेश तात्याचा रागाचा पहारा इतका टोकाला गेला की त्या शिपायाला बोलावून बेधडकपणे सांगितले तुझ्या त्या अधीक्षक अभियंता साहेबांना सांग आणि त्या आमदार साहेबांना पण सांग आम्ही कोण आहोत. आता आम्ही निघतोय परंतु एक लक्षात ठेव साहेब नक्कीच आमच्याच भेटीला येतील अशी व्यवस्था शंभर टक्के करू आणि मला रागातच चला आपण निघू असे सुनावले. हे ऐकून तात्याला मी विनंती केली जाऊद्या तात्या थांबू आपण आमदार साहेब बाहेर आल्यानंतर आपण जाऊ परंतु तात्यांनी कडक शब्दात मला सांगितले आपणाला भेटायला बोलावून इतका वेळ ताटकळत बसवायचे हे माझ्या स्वभावात बसत नाही. मी नाइलाजाने गुपचूप सुरेश तात्यांच्या पाठीमागे पायर्या उतरू लागलो.

अशा बेधडक आणि कडक स्वभावाच्या तात्याला मी पहिल्यांदाच पाहिले होते. ज्या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी नामांकित पत्रकारांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारीही ताटकळत असत. पण तात्यांनी त्या अधिकार्याची देखील भिडभाड ठेवली नव्हती हे विशेष होते.

बेधडक स्वभावाचा एक सच्चा पत्रकार मित्र कायमचा काळाच्या पडद्याआड गेला यामुळे मनाला चटका लागुन राहिला.

अशा बेधडक सुरेश तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *