दि. १६ मे

इंदापूर : शेतकरी संघर्ष समिती, इंदापूर यांच्या वतीने बुधवारी दि. १७ ला निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर (ता. इंदापूर) याठिकाणी आत्मक्लेश पदयात्रा आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, निरा- भीमा सहकारी साखर कारखाना प्रशासनाने पाच महिन्यांचा कालावधी लोटून गेला तरी अद्याप ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस बिले अदा केली नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरीता आंदोलन करण्यात येणार आहे.
शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील म्हणाले, आम्ही 10 मे रोजी कारखाना प्रशासनाला आंदोलनाचे पत्र दिल्यानंतर कारखाना प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी बैठक घेऊन 5 जून पर्यंत ऊस बिल
देण्याचा निर्णय घोषित केला. परंतु पूर्ण ऊसबीले देण्याऐवजी बीलापोटी थोडीसी रक्कम उचल देण्याचा हा प्रकार असल्याचे सांगून कारखाना प्रशासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे सांगितले.
यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष महादेव घाडगे, सचिव विजय गायकवाड, माजी सभापती प्रशांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदरील आंदोलनास निरा भीमा कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, इंदापूर, स्वाभिमानी शेतकरी संघटना, इंदापूर काँग्रेस यांनी आपला पाठिंबा दर्शविला.
या बैठकीला शेतकरी संघर्ष समितीचे धैर्यशील पाटील, अजित टिळेकर, तुकाराम घोगरे, विशाल घाडगे, युन्नुसभाई मुलाणी, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन पंजाबराव गायकवाड, काँग्रेस चे पुणे जिल्हा सरचिटणीस बिभीषण लोखंडे इंदापूर तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शेळके, चमनभाई बागवान, जकीर काझी, महादेव लोंढे आदी उपस्थित होते.
