दि. १५ सप्टेंबर

इंदापूर : (दि १५) इंदापूर शहरात जुने मार्केट कमिटीच्या भव्य पटांगणात भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडीकडे शहराबरोबरच संपूर्ण इंदापूर तालुक्याचे लक्ष वेधले आहे.
शहा परिवाराचे शहराबरोबरच इंदापूर तालुक्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. त्यामुळे या दहीहंडी उत्सवात विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांबरोबरच सामाजिक संघटनेत कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांबरोबर कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे. संपूर्ण शहरांमध्ये झळकत असलेल्या बॅनर वरून हे चित्र अधोरेखित होते.
भरतशेठ शहा व मुकुंदशेठ शहा या दोन्ही बंधूंनी घराण्याचा वारसा जपत असताना सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचे धोरण अवलंबिले असल्याने येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वेगळे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इंदापूर नगरपालिकेची निवडणूक अल्पावधीतच होण्याची शक्यता आहे .आजच्या दहीहंडी उत्सव कार्यक्रमांमध्ये कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी भरतशेठ शहा व मुकुंदशेठ शहा यांच्या नेतृत्वाखाली जर नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षासमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या दहीहंडी उत्सवात प्रमुख राजकीय पक्षाचे मातब्बर कोण कोण हजेरी लावणार याकडे शहराबरोबरच तालुका वासीयांचे यांचे लक्ष लागून राहिले आहे.
आजच्या दहीहंडी उत्सवामध्ये भाग घेणाऱ्या संघांना विविध आकर्षक बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांबरोबरच भाग घेणाऱ्या संघांमध्ये सुद्धा नवचैतन्य असल्याचे पाहावयास मिळत आहे.
शहा परिवारातील अंकिताताई शहा या इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष असताना इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास करून शहराचे नाव देशपातळीवर उंचावण्याचे काम केल्याने शहरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. माजी नगराध्यक्ष अंकिता ताई शहा यांनी या दहीहंडी उत्सवाचा शहरातील सर्व नागरिकांनी आनंद द्विगणित करावा व उपस्थित रहावे असे आवाहन केल्याने या दहीहंडीच्या उत्सव कशा पद्धतीने होईल यासाठी उत्कंठा शिगेला लागली आहे.
