दि. १० ऑक्टोबर

इंदापूर : (दि १०) इंदापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक मालोजीराजेंची गढी ढासळली. तालुक्यातीलच नव्हे तर राज्यभरातील शिवप्रेमी अक्षरशः हळहळला. गढीची झालेली दुरावस्था बघून इंदापुरातील सामाजिक संघटनेतील कार्यकर्ते व राजकीय पदाधिकारी यांनी शासन दरबारी गढीचे जतन व्हावे यासाठी अनेक वेळा मागणी केली परंतु प्रत्यक्षात काम झालेच नाही परिणामी पावसामुळे दर्शनी भागाचा बुरुज ढासळला.
पावसामुळे ढासळलेल्या गढीची पाहणी करण्यासाठी अनेक सामाजिक व राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते यांची रीग लागली. प्रत्येक जण पोट तिडकीने गढीचे संवर्धन झाले पाहिजे हा ऐतिहासिक वारसा टिकला पाहिजे येणाऱ्या पिढीला या पाऊलखुणा बघून ऊर्जा मिळाली पाहिजे असे छाती ठोकून सांगत होते. त्यातच माजी मंत्री व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करून ताबडतोब गढीचे बांधकाम काम हाती घेण्यात येईल अशी जाहीर केले.
आज (दि १०) शिवधर्म फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक अण्णा काटे व शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अॅड.पांडुरंग रायते यांनी हजारो कार्यकर्त्यांसह इंदापूर नागरिक संघर्ष समितीचे प्राध्यापक कृष्णा ताटे यांच्या उपस्थितीत ढासळलेल्या गढीची पाहणी करून शासनाने व संबंधित विभागाने परवानगी दिल्यास दानशूर व्यक्तींकडून शक्य ती मदत घेऊन व उर्वरित सर्व खर्च शिवधर्म फाउंडेशन करेल असे जाहीर केले यावेळी इंदापूर नागरी संघर्ष समितीचे प्राध्यापक कृष्णा ताटे प्रदीप पवार, लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष अनिल ढावरे व शिवधर्म फाउंडेशनचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
