दिनांक ३१ मार्च

विजेची थकबाकी शून्य करा, तसेच ग्राहकांना अखंडित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी वीज उपकेंद्रातील यंत्रणा अद्यावत ठेवून रोहित्रांची देखभाल दुरुस्ती करावी अशा सूचना महावितरणचे नूतन संचालक (संचालन) श्री. अरविंद भादीकर यांनी सातारा क्षेत्रीय भेटी दरम्यान वीज अभियंत्यांना दिल्या.
महावितरणच्या संचालक (संचालन) पदाचा नुकताच कार्यभार स्विकारल्यानंतर श्री. अरविंद भादीकर यांनी शनिवारी (दि. 30 मार्च) सातारा जिल्हा दौरा केला. आर्थिक वर्षअखेरीस होणाऱ्या वसुलीचा ग्राउंड रिपोर्ट घेताना त्यांनी अगदी शाखा कार्यालयापर्यंत भेटी दिल्या. थकबाकी शुन्य करणाऱ्या भुईंज (ता. वाई) व खंडाळा येथील जनमित्रांचा सत्कार देखील केला. तसेच इतरांनीही त्यांच्याकडील देय थकबाकी कोणत्याही परिस्थिती शून्य करण्याचे आवाहन करताना वसुलीत हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पोवई नाका व भुईंज उपकेंद्रांना भेटी देत त्यांनी उपकेंद्रातील सर्व यंत्रणेची पाहणी केली. ते म्हणाले, ‘नजीकच्या काळात महावितरणला मोठ्या प्रमाणात सौर वीज उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वीज उपकेंद्रांमधील यंत्रणा सक्षम करावी. उपकेंद्रांतील देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण करावीत. जेणेकरुन ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करणे शक्य होईल.’
कृष्णानगर सातारा येथील मंडल कार्यालय, सातारा शहरातील शहर उपविभाग, ग्राहक सुविधा केंद्र, पोवई नाका वीज उपकेंद्र, वाई विभाग, वाई एमआयडीसीतील वीज उपकेंद्र तसेच खंडाळा उपविभागाला संचालक श्री. भादीकर यांनी भेटी दिल्या. या दौऱ्यात त्यांच्या समवेत मुख्य अभियंता सुनिल पावडे, प्रभारी अधीक्षक अभियंता अमित बारटक्के यांचेसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संचालक (संचालन) श्री. भादीकर यांच्या सूचना
प्रत्येकाने आपल्या भागातील थकबाकी शून्य करावी
वीज जोडणी प्रतिक्षा यादी शून्य करणे
उपकेंद्रातील उच्चदाबाच्या रोहित्राची देखभाल दुरुस्ती
उपकेंद्रातील बॅटरी, चार्जरची निगा राखावी
वीज गळती रोखून बिलींग मध्ये वाढ करणे
थकबाकी शून्य करणाऱ्या जनमित्रांचा गौरव
थकबाकी शून्य करणाऱ्या भुईंज (ता. वाई) येथील गणेश कुदळे व प्रशांत कदम या कंत्राटी कामगारांचा तसेच खंडाळा उपविभागातील गणेश गाडे, यशवंत खाकरे, आदित्य गायकवाड या तीन जनमित्रांचा संचालक (संचालन) श्री. अरविंद भादीकर यांनी सत्कार केला.
