दिनांक १३ फेब्रुवारी

इंदापूर : इंदापूर तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षामध्ये महसुली कागदपत्रात अनेक कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत,परंतु सदर नोंदी प्राप्त करण्यासाठी संबंधितांना अडथळा निर्माण होत आहे. संबंधित कर्मचारी व अधिकारी नागरिकांच्या अर्जाची गांभीर्याने दखल घेत नाहीत. तरी आपल्या स्तरावर सापडलेल्या कुणबी नोंदी गाव निहाय प्रकाशित करण्यात याव्यात अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज (दि.१३) तहसीलदार इंदापूर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
सविस्तर माहिती अशी की इंदापूर तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षामध्ये सापडलेल्या नोंदी मोडी भाषेत असल्यास भाषांतर करून तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा समाजातील नागरिकांना माहित होण्यासाठी गावातील ग्रामपंचायत नोटीस बोर्ड व तलाठी कार्यालय येथील नोटीस बोर्ड व प्रसार माध्यमे, समाज माध्यमे यावर प्रकाशित करण्यात याव्यात व त्यास व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर संभाजी ब्रिगेड इंदापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब जगताप, उपाध्यक्ष दत्तात्रेय बोबडे, भारत राष्ट्र समितीचे तालुका संघटक निवास शेळके, सुरज गोडसे, अंकुश गलांडे,अंकुश गोसावी,आप्पासो सपकाळ,संतोष बोंद्रे,पोपट भोसले इत्यादींच्या सह्या आहेत.
