दि. १९ डिसेंबर
१६
इंदापूर : तालुक्यातील रविवारी (दि १८) रोजी पार पडलेल्या २६ ग्रामपंचायत निवडणुकी पैकी हिंगणगाव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडली.
हिंगणगाव ग्रामपंचायत ची निवडणूक अनेक कारणाने नेहमीच चर्चेत राहणारी आहे. परंतु झालेली ही निवडणूक अनेक वैशिष्ट्यपूर्ण अर्थाने लक्षात राहण्याजोगी आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत संपूर्ण प्रचार तणावपूर्ण व उत्कंठा शीगेला लावणारा असाच झाला होता. त्याचीच आठवण नुकत्याच काल झालेल्या निवडणुकीत मतदारांना आली परंतु, निवडणुकीत उभे असणारे उमेदवार,पॅनल प्रमुख व प्रचार प्रमुख यांनी अतिशय संयमी राबविलेल्या प्रचार यंत्रणा याचीच चर्चा गावात व पंचक्रोशीत आहे.
ही निवडणूक तरुण वर्गाच्या हातात गेल्याचे दिसले. दोन्ही पॅनल मधून तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने घरोघरी प्रचार करताना दिसला. भरमसाठ पैसा खर्च करून व कर्णकर्कश आवाज लाऊड स्पीकर लावून प्रचार करण्याऐवजी लोकशाहीला अभिप्रेत असा प्रचार प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी व घरोघरी जाऊन केल्याने, मतदार ,ग्रामस्थ यांनी पॅनल प्रमुख, उमेदवार व प्रचार प्रमुख यांना मनापासून धन्यवाद दिले.
गावातील अनेक तरुण स्पर्धा परीक्षा, व उच्च शिक्षण घेणारी असल्याने त्यांच्यावर या निवडणुकीचा कोणताही परिणाम होणार नाही व त्यांना गावातील निवडणुक प्रक्रियेमध्ये भाग घेताना शासन व्यवस्था समजून घेता आली पाहिजे अशी प्रचार यंत्रणा राबविली. भविष्यातील गावगाड्याचे राजकारण करताना आदर्श आचारसंहितेचे पालन करून लोकशाहीला अभिप्रेत असणारी प्रचार यंत्रणा राबविल्याने हे गाव भविष्यात आदर्श गाव म्हणून पंचक्रोशीत गणले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही हे अधोरेखित झाले.
या निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनल व जय तुळजाभवानी ग्रामविकास पॅनल असे दोन पॅनल निवडणूक रिंगणात होते. निवडणुकीनंतर दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा जरी केला असला तरी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत मतदाना दिवशी मतदार राजांनी आपल्या मताचे दान कोणत्या पॅनल मधील उमेदवाराच्या पारड्यात टाकले हे मात्र मंगळवारी निवडणूक निकालानंतरच कळणार आहे तोपर्यंत वाट बघावी लागणार.
नुकतेच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी तालुक्यात काल पार पडलेल्या निवडणुकीत योग्य नियोजन केल्याने निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली. त्यातच तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे व प्रशिक्षित निवडणूक अधिकारी व कर्मचारी असल्यामुळे हौशी कार्यकर्त्यांच्या बेलगाम वागण्याला वाव मिळाला नाही.
हिंगणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत काल झालेले मतदान पुढील प्रमाणे
वार्ड क्रमांक एक : ३२२ पैकी २७७ (८६.०२ टक्के)
वार्ड क्रमांक दोन : ५५७ पैकी ४६१ (८६.०२ टक्के)
वार्ड क्रमांक तीन : ४६४ पैकी ३९९ (८६ टक्के )
एकुण :१३४३ पैकी ११३७ मतदान झाले.
एकुण झालेल्या मताची टक्केवारी : ८४ . ६६ टक्के
