दि. ०१ एप्रिल

सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, हिंदू मुस्लिम एकतेचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इंदापूर शहरामध्ये शुक्रवारी (३१ मार्च) हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र इफ्तार करत या वारसाला अधिक बळकटी दिली. भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव दीपक आण्णा काटे यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी, लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय जगताप, मातंग एकता आंदोलनाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ललेंद्र शिंदे, जकात फाऊंडेशनचे अध्यक्ष आझाद पटेल, कुबा मस्जिदचे विश्वस्त अमीर इनामदार, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी पवार, महेश स्वामी,  सुरेश मिसाळ, राहुल ढवळे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अनेक प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच पद्धतीने देशहितासाठी एकत्र येण्याची इच्छा यावेळी सर्वांनी व्यक्त केली.

 

२४ मार्चपासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली असून, कुरआन १४४४ वर्षांपूर्वी याच महिन्यात अवतरीत झाल्याने मुस्लिम या महिन्यात रोजा ठेऊन अल्लाहप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करतात. मुस्लिम बांधवांना प्रोत्साहित करण्यासाठी, तसेच पवित्र रमजानच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजप नेते व भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव दीपक आण्णा काटे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह दौलतनगर येथील कुबा मस्जिदला इफ्तारसमयी भेट दिली. संधीचं सोनं करत सायंकाळी पाऊणे सात वाजण्याच्या सुमारास सर्वांनी एकत्रित इफ्तार करून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला. साहजिकच त्यामुळे उपस्थितांना विलुप्त होत चाललेल्या भारतीय संस्कृतीचेही खरे स्वरूप अनुभवायला मिळाले. या कार्यक्रमाने इफ्तारचा आनंद द्विगुणित झाल्याची भावना मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली.

याप्रसंगी मुस्लिम बांधवांकडून मुहम्मद पैगंबर साहेबांच्या शिकवणींवर आधारित “मुहम्मद पैगंबरांचे संस्कार” नामी पुस्तक आणि गुलाबाचे पुष्प देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला. तर पत्रकार व कुबा मस्जिदचे इमाम समीर सिराजुद्दीन सय्यद यांनी कुरआन, रामायण, गीता आणि वेदांचे संदर्भ देत सर्वांचा निर्माता एकच असल्याचे, कोणीही उच्च-नीच नसून सर्व मानवजात एकाच माता-पित्याची लेकरे व आपापसात रक्ताचे भाऊ असल्याचे म्हटले. 

 

चौकट :-

 

अनेक जाती धर्मांना आपलीशी वाटणारी, तथा अनेक जाती धर्मांना आपल्यात सामावून घेणारी आपली भारतीय संस्कृती आहे. वसुधैव कुटुंबकम, अवघे विश्वची माझे घर ही हिंदू धर्माची शिकवण आपल्याला एकत्र जोडण्यास मदत करते. याच प्रेरणेतून आम्ही याठिकाणी आलो असून, एकत्र इफ्तार करण्याचा व मस्जिदला भेट देण्याचा अनुभव अनोखा व अभूतपूर्व होता. सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा – दीपक आण्णा काटे (महाराष्ट्र प्रदेश सचिव, भाजप युवा मोर्चा)

 

चौकट :-

 

रोजा/उपवासाची संकल्पना प्रत्येक धर्मात आहे. उपवास हे ईशकृतज्ञ होण्यासाठी गरजेचे असून, संस्कारक्षम व चारित्र्यसंपन्न व्यक्ती बनण्याचे ते प्रशिक्षण देतात. सर्वांचा निर्माता एकच असून, सर्व धर्मांची मुळ शिकवणही एकच आहे. त्यामुळे आपापसातील मतभेदांना मूठमाती देऊन किमान देशहितासाठी “समानो मन्त्रः समिति समानी समानं मनः सह चित्तमेषाम्।” या ऋग्वेदातील शिकवणीवर आचरण करण्याची आज गरज आहे – समीर सय्यद (पत्रकार, तथा कुबा मस्जिदचे इमाम)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *