प्रकाश आरडे… स्वराज्य न्युज

इंदापूर : पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी कालच नवनियुक्त पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी इंदापूर पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारला. आज तालुक्यातील पोलीस पाटील यांची बैठक पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आली . या बैठकीमध्ये पहिलाच आगळा आणि वेगळा समेटाचा निर्णय पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घडवून आणल्याने या निर्णयाचे स्वागत तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांनी केले.
सविस्तर माहिती अशी की पोलीस पाटील यांची मीटिंग आयोजित केले असता पोलीस पाटील यांनी नवनियुक्त पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचा परंपरेनुसार पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतेवेळी दोन वेगवेगळ्या महाराष्ट्र पोलीस पाटील असोसिएशन संघटना पोलीस पाटील संघ या दोन संघटनेने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला हे चित्र पाहून दोनदा सन्मान ? अशी विचारणा केल्याने समजले की तालुक्यात पोलीस पाटील यांच्या दोन संघटना कार्यरत आहेत. यावर दोन्ही संघटनाच्या सदस्याशी चर्चा करून तालुक्यामध्ये एकच संघटना कार्यरत असावी असा प्रस्ताव सर्व पोलीस पाटील यांच्यासमोर नवनियुक्त पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी ठेवला व चर्चेअंती पूर्वीचे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष चाकाटी गावचे भारत
मारकड यांनी मनाचा मोठेपणा दाखवून जर सर्व पोलीस पाटील एका छत्राखाली येत असतील तर माझी काही हरकत नाही असा संदेश देत आपल्या पदाचा राजीनामा दिला.
नवीन तालुकाध्यक्ष पदासाठी सर्वानुमते महिला गलांडवाडी नंबर एक च्या पोलीस पाटील सोनाली अनंता बोडके व पुरुष पडस्थळ गावचे पोलीस पाटील सुनील जालिंदर राऊत या दोघांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. चिट्ठी सोडती द्वारे सुनील राऊत यांची नवीन तालुका अध्यक्ष म्हणून तर सोनाली अनंता बोडके यांची तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली. या निर्णयाचे स्वागत तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांनी टाळ्याच्या गजरात केले व नवनियुक्त पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचा हा निर्णय येणाऱ्या भविष्यातील अडचणीवर कशा पद्धतीने मात करावी व प्रशासक कसा असावा याची जणू चुणूकच दाखवून दिली आहे.
यावेळी तालुक्यातील महिला पुरुष पोलीस पाटील उपस्थित होते.
