दिनांक 2 मार्च 

इंदापुर ….

सध्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. जागा निश्चिती संदर्भात पक्ष व नेते बैठकीत व्यस्त असतानाच पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या मनातील भावना व नेते विषयी असणारी निष्ठा आक्रमक पणे मांडताना दिसत आहेत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आक्रमक भावनेपुढे नेत्यांना नमते घेतल्याशिवाय गत्यंतर नाही अशी अवस्था येत्या काळात दिसणार हे नक्की.

राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे त्रिवार सत्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गळी उतरवताना ज्या त्या पक्षातील नेत्यांची नक्कीच सत्वपरीक्षा आसणार आहे. गर्दीत आपलेच घोडे कसे दामटायचे याचे पुरेपूर आकलन ज्या त्या पक्षाच्या नेते मंडळींना बरोबर असते हे आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात दिसून आलेले आहे.

महाराष्ट्रात सध्या तीन पक्षाचे विद्यमान सरकार सत्तेवर आहे. या तीनही पक्षांच्या वाट्याला कोणते मतदार संघ येणार, उमेदवार कोण असणार, जर आपल्या पक्षाच्या हमखास निवडून येणाऱ्या उमेदवाराला तिकीट न देता दुसऱ्या पक्षाच्या वाट्याला ती जागा गेल्यास कार्यकर्त्याची कुचंबना होणार हे नक्की. मग तो पक्षावर व नेत्यावर आगपाखड करून निष्ठेचा बाजार मांडून विरोधी पक्षात डेरे दाखल होऊन आपली राजकीय व्यवस्था करणारे अनेक जण येत्या काळात दिसून येणारच आहेत. हे चित्र सर्रास प्रत्येक मतदारसंघात दिसून येण्याची दाट शक्यता आहे. सध्या प्रत्येक पक्षाचे प्रत्येक मतदारसंघात बैठका व मेळाव्यांचे सत्र सुरू असून आपणच या मतदारसंघाचा विकास करू शकतो ही भावना मतदारांच्या अंतर्मनापर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे.

                        नेत्यांचा व पक्षांचा हा अजेंडा जरी असला तरी या स्पर्धेच्या युगातील मतदार फार चाणाक्ष व हुशार आहे, त्याला माहिती आहे आपल्या मताची किंमत नक्कीच तो दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. एक मात्र खरे आहे याच पुरोगामी महाराष्ट्रात तत्त्वाचे राजकारण संपल्याचे गेल्या अनेक घडामोडीतून दिसून येत आहे. येत्या लोकसभा विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विद्यमान सरकार व विरोधी पक्ष यांच्याविषयी असणारी भावना मतदार नक्कीच आपल्या मतातून दाखवून देणार आहेतच तोपर्यंत मतदार राजा उघड्या डोळ्यांनी घडणाऱ्या राजकीय उलथा पालथी बघुन व घसरत चाललेला राजकीय भाषणाचा स्तर यांचा पद्धतशीर कानोसा घेउन आपले मत कोणाला द्यायचे हे नक्की ठरवणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *