दिनांक १७ मार्च

इंदापुर : स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सर्वच निवडणुकांमध्ये मतदार व शेतकऱ्यांना गृहीत धरून आश्वासनांची खैरात केली जाते . या भुलथापांना आता मतदार व शेतकरी बळी पडणार नाहीत असे भाटनिमगावचे माजी सरपंच मनोहर भोसले यांनी ठासून सांगितले.
सविस्तर बातमी काल दि(१६) रोजी बारामती लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ डिकसळ येथे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने बोलताना म्हणाले की अडचणीच्या काळात सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची कदर करू. त्यांना योग्य सन्मान दिला जाईल, त्यांना मदत करु.
हाच धागा पकडून भाटनिमगावचे माजी सरपंच मनोहर भोसले म्हणाले की कार्यकर्त्यांची कदर करण्यापेक्षा व मदत करण्यापेक्षा जो शेतकरी अडचणीत आला आहे, दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे ,आपल्या ताब्यात असणारा सोनाई दूध संघ हा तालुक्यातून लाखो लिटर दुधाचे कलेक्शन करत असून शेतकरी इमाने इतबारे आपल्या दूध संघाला दूध देत आहेत, आपला संघ जिल्ह्यात राज्यात व भारतात नावाजलेला दूध संघ म्हणून ओळखला जातो. कार्यकर्ता हा दूध उत्पादकच आहे त्यामुळे आपणच दुधाला जास्तीचा दर दिल्याने कार्यकर्त्याची कदर करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही व जास्तीचा दर दिल्याने त्याचे रूपांतर नक्कीच इमानदार शेतकरी मतांमध्ये करेल. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की मतदार व शेतकरी खोट्या आश्वासनाला आता बळी पडणार नाहीत.
जसे मनोहर भोसले आक्रमकपणे मतदार व शेतकऱ्यांच्या बाजूने सडेतोड आपली भूमिका स्पष्ट करीत आहेत तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या काळात गावोगावचे मतदार शेतकरी व नेते प्रचारार्थ येणाऱ्यांना ठणकावून सांगतील असेच सध्या तालुक्यात चित्र आहे.
