दिनांक १५ फेब्रुवारी

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. विखे पाटलानंतर कट्टर काँग्रेसी असणारे चव्हाण कुटुंब भाजपात सामील झाले, त्यातच अमित देशमुख भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जातेय. कट्टर काँग्रेसी घराणी भाजपाच्या गळाला का लागतायत ?

अशोक चव्हाण यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसचे इतर आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. वडिलांपासून कायम काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले चव्हाण कुटुंब आज काँग्रेस पासून का दुरावतेय ? अशोक चव्हाण यांना काँग्रेसने राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाची पदे देखील दिली. अशोक चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असून दोन वेळा मुख्यमंत्री होते .माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे ते सुपुत्र आहेत. अशोक चव्हाण पाच वेळा आमदार राहिले आहेत, दोन वेळा ते खासदार होते. पुणे विद्यापीठ प्रतिनिधी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

१९८६ ते १९८९ या काळात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष ते राहिले आहेत. तिसाव्या वर्षी ते खासदार झाले .पहिली लोकसभा निवडणूक ते १९८७ साली लढली.१९९२ला त्यांची विधान परिषदेवर निवड झाली. १९९३ ला पहिल्यांदा मंत्री झाले ,त्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग,नगर विकास आणि गृह विभागाचे राज्यमंत्री अशी संधी मिळाली. १९९५ ते १९९९ ते काँग्रेसचे सरचिटणीस होते .२००४ ला ते मुदखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले ,लगेच त्यांना मंत्रिमंडळात उद्योग आणि खनिकर्म विभागाचे जबाबदारी मिळाली. २००८ ला मुंबई अतिरेकी हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.

२०१० मध्ये आदर्श घोटाळ्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता .२०१४ ला मोदी लाटेत ते काँग्रेस मधून विजयी झाले .२०१५ ला त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. २०१९ मध्ये मविआ मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री होते. काँग्रेस वर्किंग कमिटीचे ते सदस्य होते. नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत ते काँग्रेसचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडत होते .

त्यांचे वडील शंकरराव चव्हाण कट्टर काँग्रेस विचारांचे पाईक होते. राजकीय नैतिकता धुळीस मिळालेल्या आजच्या काळात वसंतराव नाईकांसारखे नेते शेवटपर्यंत काँग्रेस सोबत राहिले पण त्याच परंपरागत घराण्यातील अशोक चव्हाण भाजपा मध्ये गेले हे आश्चर्य आहे.

नांदेड मधील चव्हाण कुटुंबिया प्रमाणेच लातूरमधील देशमुख कुटुंबीय देखील कट्टर काँग्रेसी .कायम एकनिष्ठ राहिलेल्या देशमुख कुटुंबीय ची पुढील पिढी भाजपाच्या वाटेवर आहे अशी जोरदार चर्चा आहे.अशोक चव्हाण यांच्यासोबत अमीत व धीरज देशमुख भाजपाच्या मार्गावर आहेत अशी चर्चा आहे. चव्हाण, विखे पाटील, देशमुख ही कट्टर काँग्रेस विचारधारेची घराणे, पण गेल्या काही काळात याच कट्टर काँग्रेसी घराण्यांना गळाला लावण्यात भाजपाला यश आले आहे. खानदानी काँग्रेसी असलेली घराणी भाजपाकडे का झुकली ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. भारताच्या निर्मितीपासून विकसित होत गेलेल्या काँग्रेसची मुळे देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेली आहेत. मोजकी काँग्रेसची घराणी गळाला लावून काँग्रेस संपणार का ? हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होईलच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *