
तातडीने पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई मिळावी…
आ. बबनदादा शिंदे
मुकुंद रामदासीबें : बेंबळे प्रतिनिधी…..
माढा तालुक्यातील निमगाव( टे.) रोपळे कव्हे , कुर्डू आणि भोसरे परिसरात गुरुवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी पाच ते सहा तासात धुवाधार ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झालेला असून पिंपळनेर ते विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना म्हसोबा रस्ता, कुर्डूवाडी नजीकचा बेंद ओढ्यावरील रस्ता तसेच ग्रामीण भागातील अनेक रस्ते पावसाच्या पाण्यामुळे बंद झाले व वाहून गेले आहेत. विशेष म्हणजे ढगफुटी सदृश्य पावसाच्या पाण्याच्या प्रेशरमुळे मौजे चौभे पिंपरी येथील पाझर तलाव फुटला असुन अनेकांच्या शेतात पाणी गेले आहे, सर्वत्र पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे , गावो गावचे नागरिक भयभीत झाले आहेत.
वृत्तांत असा की निमगाव टे., भोगेवाडी ,कव्हे, जाखले, ढवळस, चौबे पिंपरी, उपळवाटे, साखर कारखाना, पिंपळनेर परिसर ,भोसरे परिसर व कुर्डू परिसर या भागामध्ये गुरुवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन ते चार वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत हस्त नक्षत्राच्या ढगफुटी सदृश्य धुवाधार पावसाने धुमाकूळ घातला आहे .यामुळे शेतीचे, घरादाराचे,व अनेकांच्या प्रपंचाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे .
विशेष म्हणजे सध्या पावसाळा संपत आलेला असला तरी माढा तालुक्यामध्ये व विशेषता सोलापूर जिल्ह्यात देखील सरासरी एवढा अद्याप पाऊस झालेला नाही, परंतु हस्त नक्षत्राच्या 6 ऑक्टोबर रोजी माढा तालुक्यातील निमगाव, पिंपळनेर ,कुर्डू, ढवळस, भोसरे, रोपळे कव्हे या परिसरात कांहीं तासात झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे व अवघ्या थोड्याच वेळात या परिसरात सरासरी 142 ते 150 मिलिमीटर पाऊस झाला असल्याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली आहे. त्याचप्रमाणे माढा तालुक्याच्या बेंबळे,घोटी, वरवडे, परिते ,अकोले बुद्रुक या परिसरातही मोठ्या प्रमाणात परजन्यवृष्टी झालेली आहे. सर्वत्र झालेल्या या पावसामुळे ताली, बांध फुटले आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी उठून गेल्या आहेत, पिके वाहून गेलीआहेत, उसाच्या सऱ्या गच्च भरुन वाहील्यामुळे जमिनी उठून गेल्या आहेत , द्राक्ष ,डाळिंब, केळी यादी फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे .पाझर तलाव फुटल्यामुळे चौबे पिंपरीच्या परिसरात सर्वात जास्त शेतीचे नुकसान झालेले आहे व त्यामधील पिके ही वाहून गेलेली आहेत ,अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे संसार उपयोग साहित्य व कपडे व इतर प्रापंचिक साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे. ढवळस येथील रेल्वे पुलाखाली तयार केलेल्या रस्त्यावर सहा ते सात फूट पाणी साचले आहे, कारण या पाण्याला वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजूनी सोय केलेली नाही त्यामुळे पुलाखालून वाहतूक बंद आहे व नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
चौकट …। नुकसानीचे तातडीने पंचनामे होउन नुकसान भरपाई मिळावी..
आ. बबनदादा शिंदे,
सहा ऑक्टोबर रोजी दिवसा व रात्री झालेल्या धुवाधार, मुसळधार, ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या अतोनात नुकसानीचे माढा तहसीलदार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने आपली यंत्रणा कामाला लावून नुकसानीचे पंचनामे करावेत व संबंधितांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी ताबडतोब शिफारस करावी, मी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहेच।… असे प्रतिपादन आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे.
