बारामती : (दि. १८ जानेवारी) ,  वीज कनेक्शन देण्यास हयगय व अर्ज दाबून ठेवणाऱ्या सुपे येथील कनिष्ठ अभियंत्यावर महावितरणने निलंबनाची कारवाई केली आहे. बारामती येथील कार्यकारी अभियंता यांनी ही कारवाई केली असून, ग्राहकसेवेप्रती कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची गय करणार नसल्याचा संदेश या कारवाईने दिला आहे.
अर्ज केला तरी कनेक्शन मिळत नाही, भेटायला आले तर अभियंता गायब असतात अशा अनेक तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून सुपे येथील वीज ग्राहकांकडून येत होत्या. त्याबाबत संबंधित अभियंता श्री. अभिषेक पुंडलिक मडावी यांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस व आरोप पत्र देऊन ५१ हजारांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आला. मात्र तरीही कामात कसलीही सुधारणा झाली नसल्याने बारामती विभागीय कार्यालयाने श्री. मडावी यांचेवर बुधवारी (दि. १८) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबन काळात श्री. मडावी यांना वालचंदनगर उपविभागीय कार्यालयात हजेरी लावावी लागेल. तसेच पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडून जाता येणार नाही.
सध्या महावितरण कंपनी शेतकरी मेळावे घेऊन शेतीपंपाला कनेक्शन देत आहे. मात्र सुपे येथील अभियंता मडावी यांनी जवळपास ६३ ग्राहकांचे अर्ज दाबून ठेवले. त्यांना कनेक्शन दिले नाही. त्यांच्यामुळे कंपनीचा सुमारे ५ लाख १३ हजारांचा महसूल बुडाला. त्यांच्या कामाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे अनेक तक्रारी येत होत्या. जेंव्हा वरिष्ठांनी ११ जानेवारी २०२३ रोजी सुपा येथे ग्राहक मेळावा घेतला. तेंव्हा अनेक ग्राहकांनी महावितरणकडे मडावी यांच्या कामाच्या तक्रारींचा पाढाच वाचला. या मेळाव्याला हजर राहण्याचे सौजन्य सुद्धा त्यांनी दाखविले नाही. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून ते कोणत्याही रजेशिवाय गैरहजर आहेत. परिणामी वरिष्ठांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईचे नागरिकांतून स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *