दि.२० नोव्हेंबर

इंदापूर :-
रेडा (ता.इंदापूर,पुणे) श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा हा नगर जिल्ह्यातील कौठा येथून मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी पंढरपूरकडे कार्तिकी वारीसाठी प्रस्थान झाला असून (दि.१८) नोव्हेंबर रोजी रेडा गावात श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळ्याचे आगमन होताच पवार कुटुंबाचे प्रमुख माजी ग्रामपंचायत सदस्य सुखदेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तोपाची सलामी देऊन स्वागत करण्यात आले. श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळ्याचे हे ४६ वर्ष असून रेडा गावातील पवार कुटुंब हे कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर कडे जाणाऱ्या शेकडो वारकऱ्यांचे स्वागत करत असतात .
पवार कुटुंबाची गेली चार दशक कार्तिकी एकादशी निमित्त जाणाऱ्या श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळ्याचे स्वागत व सेवा करण्याची परंपरा जपली असून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना कोल्हापुरी फेटे बांधून, चहापाणी, फटाक्याची आतिषबाजीने स्वागत करत असतात. या स्वागताने अक्षरशः वारकरी मंडळी भारावून जातात. दिंडी सोहळ्यातील महिलांना व मानाचे मानकरी यांना कोल्हापुरी फेटे बांधून स्वागत केल्याने महिला मंडळींच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता.
आषाढी वारी ,कार्तिकी वारी, माघी वारीसाठी लाखो वारकरी मंडळी पंढरपूरकडे विठ्ठल दर्शनाची आस घेऊन अक्षरशा ऊन, वारा, पाऊस, संसाराची तमा न करता, देहभान विसरून पंढरपूरकडे जात असतात. गुरुवर्य निवृत्ती (आण्णा) शिपलकर, वै. गुणाईमाता निवृत्ती शिपलकर यांच्या प्रेरणेने हा दिंडी सोहळा पंढरपूरकडे पायी वारी गेली ४६ वर्ष करत आहे. त्यामध्ये ह. भ. प. दत्तात्रय महाराज शिपलकर, सोमनाथ महाराज शिपलकर, रावसाहेब शिपलकर(गुरूजी),भानुदास दातीर महाराज ,हरी घोडके, विणेकरी कुमार काका कुलकर्णी, चोपदार हनुमंत नारायण शिपलकर, संजय कुदळे, बाळासाहेब ढोके, वामन रांहीज , नानासाहेब थोरात,रामा आण्णा शितोळे, भीमसेन खरात,आदी वारकरी मंडळींनी वारीतील अनुभव कथन केले.
त्याचप्रमाणे ह.भ.प. बबन महाराज ट्रेलर, बाळासाहेब नागवडे यांनी बहारदार भारुडाचा आणि भजनाचा कार्यक्रम सादर केला.विठ्ठलाच्या चरणी एवढीच आम्ही प्रार्थना करतो की, शेतकरी आणि सर्व सामान्य जनतेचे या दुष्काळाच्या संकटात मुक्त करावे हीच विठ्ठल चरणी प्रार्थना आणि जन्मोजन्मी वैष्णवांची सेवा घडो अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करत पवार कुटुंबाकडून भावना व्यक्त केल्या. श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळा हा पवार कुटुंबाच्या पाहुणचार घेतल्यानंतर रेडा गावातील जालिंदर देवकर यांच्या निवासस्थानी मुक्कामाकडे मार्गस्थ झाला.
____________
श्री क्षेत्र दिंडी सोहळ्याचे ४६ वे वर्ष-ह.भ.प. रावसाहेब शिपलकर
श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर कौठा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे हे ४६ वर्ष असून ऊन, वारा, पाऊस, संसार याचे देहभान विसरून पंढरपुरकडे पंढरीच्या दर्शनासाठी हे वारकरी मंडळी निघाले आहेत. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाच्या आस घेऊन वारकरी निघाले आहेत. गेले ४० वर्षे रेडा ग्रामस्थ ज्या पद्धतीने स्वागत करतात अक्षरशः आम्ही सर्व वारकरी मंडळी भारावून जातो.रेड्या गावात आल्यानंतर आम्हाला आमच्या घरी आल्यासारखा अनुभव वाटतो आणि परमेश्वराच्या भेटीच्या ओढीने हा दिंडी सोहळ्यातील प्रत्येक वारकरी पायी चालत असतो.पंढरपूर मध्ये दिंडी सोहळा पोहोचल्यानंतर चार दिवस जिजाऊ सांस्कृतिक कार्यालय पंढरपूर येथे मुक्काम असणार आहे.नगर प्रदक्षिणा करून, गोपाळ काला करून पुन्हा दिंडी सोहळा कौठा श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर कडे परतीचा प्रवास सुरू करणार आहे.
___________
रेडा गावातील ग्रामस्थांचे प्रेमाचे आणि आनंदाचे स्वागत इतर कुठेच नाही- ह.भ.प.दत्तात्रय शिपलकर
गेली ४० वर्ष रेडा गावातील ग्रामस्थ प्रेमाने आणि आनंदाने स्वागत करतात असे स्वागत व सेवा दिंडी प्रस्थान ते पंढरपूर पर्यंत इतर कुठेच अशा पद्धतीचे स्वागत केले जात नाही. गेली कित्येक वर्ष रेडा गावातील पवार परिवाराचे प्रमुख सुखदेव पवार आणि त्यांचे पुत्र पत्रकार कैलास पवार हे आमच्या दिंडी सोहळ्याचे अतिशय मोठ्या उत्साहात स्वागत करतात. दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत केले जाते. यावर्षी महिला सह पुरुषांना मोठ्या प्रमाणात फेटे बांधून, फटाक्याची आतिषबाजीने आमचे स्वागत केले. आमच्या दिंडी सोहळ्यातील प्रत्येक वारकरी अक्षरशः भारावून जातो.दुष्काळाची परिस्थिती असली तरी प्रत्येक वारकरी हा रेडा गावातील पवार कुटुंबाच्या स्वागताने सुखावून जातो.
