
इंदापूर : स्वराज्य न्यूज नेटवर्क
कांदलगाव (ता. इंदापूर) या गावामध्ये बोगस रेकॉर्ड तयार करून रस्त्याच्या कामाची बिले काढल्याची तक्रार ग्रामस्थानी इंदापूर पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे दाखल केली होती. याची दौंड येथील समितीमार्फत चौकशी करण्यात आली होती. सदर चौकशी दरम्यान पुढील मुद्दे समोर आले.
सदर रस्त्याच्या कामाची टेंडर प्रक्रिया पंचायत समितीस्तरावरून राबवणे आवश्यक असताना टेंडर प्रक्रिया ग्रामपंचायत स्तरावरून केल्याचे आढळून आले. प्रशासकीय मान्यता नसलेल्या रस्त्यावर काम करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने प्रशासकीय मान्यता बदलून घेणे गरजेचे होते, त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. सदर कामाच्या दर्जाबाबत मुद्दे उपस्थित केलेले होते.परंतु उपलब्ध अभिलेख्यावरुन सदरची कामे मार्च २०२० साली पूर्ण केलेली आहेत.दोषदायित्व कालावधी २ वर्षाचा नमूद केला आहे. सदर कामांसोबत साहित्य चाचणी अहवाल सोबत जोडला आहे.शाखा अभियंता व उपअभियंता यांनी मोजमाप पुस्तिकेमध्ये केलेल्या कामाचे वर्णन व प्रत्यक्ष दाखवलेल्या कामाचे ठिकाण यांत तफावत आढळते.
कामाच्या बदललेल्या ठिकाणी लोकवर्गणीतून कामे केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे होते, परंतु त्याबाबत कोणतेही सबळ पुरावे तक्रारदार सादर करू शकले नाहीत.
●● काय आहे नेमके प्रकरण
इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथे सन १८-१९ मध्ये २५१५-१२३८ अंतर्गत प्रत्येकी ३ लाखांची एकूण १३ कामे मंजूर होती. ही कामे मार्च २०२० मध्ये पूर्ण झाली. त्यानंतर गावातीलच काही ग्रामस्थांनी गावातील रस्तेच गायब झाल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी इंदापूरचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट व दौंडचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी त्यांच्या संबंधित बांधकाम यंत्रणेसह स्थळपाहणी केली. दोन्ही ही समित्यांनी कांदलगाव येथे रस्त्याची कामे झालेली आहेत, परंतु मंजूर ठिकाणी न होता गावातच इतर ठिकाणी झालेली आहेत. बदललेल्या ठिकाणांसाठी प्रशासकीय मान्यता घेण्यात आली नसल्याचे नमूद केले. आता युवकांच्या तक्रारीनंतर ग्रामपंचायती रस्त्यांच्या कामांमध्ये खरोखरच भ्रष्टाचार झाला आहे की, ही केवळ प्रशासकीय अनियमितता आहे ? हा प्रश्न उरतो आहे. ग्रामपंचायतीने केलेली निविदा प्रक्रिया जर अवैध होती, तर ती जिल्हा परिषदेकडून का स्वीकारण्यात आली ? आणि जर ग्रामपंचायतीने केलेली निविदा प्रक्रिया जर वैध होती तर बिले ग्रामपंचायत खात्यावर का जमा नाहीत.
●● सन १८-१९ मध्ये करण्यात आलेली रस्त्यांची कामे गावातच झालेली आहेत. निधी माघारी जाऊ नये, यासाठी कोविड काळात आपत्कालीन परिस्थितीत ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन ही कामे पूर्ण करवून घेतली होती. सदर रस्त्यांच्या कामात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही, आणि भ्रष्टाचार झालाच असेल तर त्यास सर्वस्वी जबाबदार जिल्हा परिषदेची यंत्रणा आहे, कारण ग्रामपंचायतीने सदर कामांच्या बिलाची मागणी किंवा शिफारस केलेली नाही.
रेखा दशरथ बाबर.तात्कालीन उपसरपंच कांदलगाव.
====================================
●● कांदलगाव येथील रस्त्याच्या तक्रारीवरून ग्रामसेविका स्वाती लोंढे यांच्यावर झालेली कारवाई अन्यायकारक आहे. कारण निविदा प्रक्रिया जरी ग्रामपंचायतीने केलेली असली तरी देयके अदा करण्याचे काम जिल्हा परिषद यंत्रणेने केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार किंवा अपहार केला आहे, असे म्हणणे अतिशय हास्यास्पद आहे. सदर सर्व झालेले आरोप व कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने झालेली आहे.
कोंडाबाई जाधव विद्यमान उपसरपंच कांदलगाव.
