दिनांक १९ फेब्रुवारी

इंदापूर : इंदापूर विधानसभेला सलग दोन पराभवाची सल हर्षवर्धन पाटील व कार्यकर्त्यांना असल्याचे परवा(दि१६) झालेल्या इंदापूर येथील पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजप कोअर कमिटी चे इंदापूर तालुका अध्यक्ष राजवर्धन पाटील व भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिसून आले.
पत्रकार परिषदेत अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की आम्ही आघाडी धर्माचे पालन करून इंदापुर
विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला मताधिक्य दिले. परंतु विधानसभेला आमची फसवणूक झाली. आमच्या पाठीत खंजीर खुपसला .विद्यमान परिस्थितीत आम्ही लोकसभेला मदत करण्यास तयार आहोत,परंतु विधानसभेला आमचे काम करणार असाल तरच.
अंकिता पाटील ठाकरे यांच्या वक्तव्यावरून त्यांनी अप्रत्यक्ष अजित पवार यांना खडे बोल सुनावून इंदापुरातून बारामती लोकसभेची नाकाबंदी करण्याच्या दृष्टीने तयारी केल्याचे दिसून येते. त्यामुळे जरी अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लोकसभेची निवडणूक जिंकून येण्याची जय्यत तयारी केली असली तरी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते इंदापुरातून नाकाबंदी करण्याच्या तयारीत असल्याचेच दिसून येते.
राजवर्धन पाटील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की भाजपाची राज्याची, जिल्ह्याची कार्यकारणी किंवा तालुक्याची कार्यकारणी असेल यांच्या मध्ये समन्वय ठेवून युवा मोर्चा, वरिष्ठ पदाधिकारी व भाजपातील जुने सहकारी यांना सोबत घेऊन लवकरच कार्यकर्ता मेळावा घेऊन या सर्वांना ताकद देऊन इंदापूर विधानसभा लढविण्याच्या दृष्टीने भक्कम तयारी करणार आहोत. पुढे बोलताना असेही म्हणाले की लवकरच भाजपा कार्यकर्ते व मतदार यांचा भव्य असा मेळावा इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत घेणार आहोत कार्यकर्त्याची मते जाणुन घेउन पुढील भूमिका जाहिर करु.
एकूणच बारामती लोकसभेची निवडणूक अतिशय चुरशीची व संघर्षाची होणार यावर शिक्कामोर्तब झाले.
